13 शहरांमध्ये झाली लशीची डिलिव्हरी; कोणत्या राज्याला किती डोस मिळाले?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 12 January 2021

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु केले जाणार आहे

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी डोस विकत घेतले आहेत. देशात या लशींचे वितरण केले जाणार आहे. देशातील 13 शहरांमध्ये लस पाठवण्यात आली आहे.

सर्वात आधी दिल्लीमध्ये पोहोचली लशीची खेप

कोरोना लशीची पहिली खेप मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचली. सीरमने ट्रकमध्ये भरुन लस पुणे विमानतळावर पोहोचवल्या. तेथून या लशी 13 वेगवेगळ्या ठिकाणांवर पाठवण्यात आल्या. स्पाईसजेट विमानाने लस दिल्लीत पोहोचली. दिल्लीत 16 जानेवारीला 89 केंद्रावर लस दिली जाणार आहे. 

गुजरातमध्येही पोहोचली लस

कोरोना लशीची खेप अहमदाबाद येथेही पोहोचली आहे. अहमदाबादमध्ये लशीचे 2.76 लाख डोस आले आहेत. 16 जानेवारीला 287 केंद्रावर लसीकरण होणार आहे. 

केंद्र सरकारला दणका; कृषी कायद्यांवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, समितीची नेमणूक

लखनऊमध्ये चार वाजता पोहोचेल लशीची खेप

दुपारी 2 वाजता इंडिगोचे विमान 60 हजार डोस घेऊन उत्तर प्रदेशला उड्डान करणार आहे. चार वाजता लखनऊला हे विमान पोहोचेल. 60 हजार लशींचे डोस सुरक्षा व्यवस्थेत ऐशबाग येथे घेऊन जाण्यात येतील. 

तमिळनाडूत पोहोचली लस

मंगळवारी सकाळी पुण्यावरुन तमिळनाडूमध्ये लस पाठवण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास 5.56 लाख डोस पोहोचवण्यात आले आहेत. 

मुंबईला रस्त्यामार्गे पोहोचवली जातेय लस

कोरोना लस सीरम इन्स्टिट्यूटमधून मुंबईला पाठवण्यात आली आहे. रस्त्याच्या मार्गे लस रवाना करण्यात आली आहे. यासाठी 'कूल-एक्स कोल्ड चेन लिमिटेड'च्या ट्रकांचा वापर करण्यात आला आहे. 

बिहारमध्ये पोहोचली लस

पुणे विमानतळावरुन पाटणासाठी विमान उडाले आहे. कोणत्याही वेळी लस पाटणामध्ये पोहोचेल. लसीकरणासाठी बिहारमध्ये 4.62 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पोहोचताहेत 7 लाख लशीचे डोस

कोलकातामध्ये आज जवळपास 7 लाख डोस पोहोचवले जात आहेत. दुपारपर्यंत 6.89 लाख डोस पश्चिम बंगालमध्ये पोहोचतील. राज्यात 941 कोविड चेन पॉईंट बनवण्यात आले आहेत. 

पाकिस्तान-चीन एकत्र आले तर...; लष्कर प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

आंध्र पदेशात पाठवली लस

आंध्रासाठी विमान उड्डान केले आहे. आंध्रात पहिल्या टप्प्यात 3.6 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. राज्यात 1940 केंद्र बनवण्यात आले आहेत. 

हैदराबादसाठी लस रवाना

पुणे विमानतळातून लस हैदराबादला पाठवण्यात आली आहे. तेलंगणात 139 केंद्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण होईल. पहिल्या दिवशी 13,900 जणांना लस दिली जाईल. आतापर्यंत 2,90,000 आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं नावं नोंदवलं आहे. 

कुठे कुठे गेली लस 

पुण्यातून अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु, कर्नाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड, पाटणा आणि भूवनेश्वरला लस पाठवण्यात आली आहे. आज पुण्यातून 56.5 लाख डोस विविध शहरांत पाठवण्यता आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first consignment of covishield vaccines reach at delhi ahemdabad mumbai