बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे उतरणार राजकारणात; सत्ताधाऱ्यांना देणार साथ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

पटना: शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. या  पार्श्वभूमीवरच आज एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेडमध्ये सामील होणार आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी त्यांना पक्ष कार्यालयात बोलावलं आहे. तसेच ते आजच पक्षाची सदस्यता स्वीकारणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. 

हेही वाचा - कोरोनाशी लढा आणि काँग्रेसची 'सफाई', एका दगडात शिवराज सिंहांनी मारले दोन पक्षी

बिहारच्या डिजीपी पदावर राहिलेल्या गुप्तेश्वर  पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतरच असा अंदाज लावला जात होता की ते वाल्मिकीनगरमधून लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूक लढवू शकतात. नीतीन कुमार यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या जनता दल युनायटेडकडून त्यांना वाल्मिकी नगर मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यास संधी मिळू शकते. दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवारी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 24 तासातच ती स्विकारण्यात आली होती. ते राजकारणात येणार आहेत, अशी चर्चा जोरदारपणे सुरु होतीच. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त  पाचच महिने उरले असताना त्यांनी ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे. मात्र, यावर काँग्रेसने भाजप निशाना साधताना म्हटलं होतं की, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्रावर टिका करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक पांडे यांचा वापर केला आहे. म्हणूनच, आता त्यांना बक्षिस म्हणून राजकारणात संधी दिली जात आहे. 
यावर उत्तर देताना गुप्तेश्वर पांडे म्हटलं होतं की, राजकारणात माझा कुणीही गॉडफादर नाहीये. अथवा माझ्या कुंटुंबाचीही कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. काहींना हेच पचत नाहीये. 

हेही वाचा - Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्रातील सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टिकाही केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former bihar dgp gupteshwar pandey to join nitish kumars jdu