प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली; रुग्णालयाने दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मुखर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जीवरक्षक प्रणालीवर आहेत.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती आणखीनच खालावली असल्याची माहिती लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मुखर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जीवरक्षक प्रणालीवर आहेत. अर्थात, उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि माजी खासदार अभिजीत बॅनर्जी यांनी दिली. रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिवशीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोमात आहेत. 

प्रणव मुखर्जींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना 10 ऑगस्टला ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने शस्त्रक्रिया झाली होती. त्याआधी त्यांची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली होती. मुखर्जींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शस्त्रक्रियेनंतर मुखर्जींची प्रकृती नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. 

दरम्यानच्या काळात मुखर्जींच्या प्रकृतीबाबत अफवाही पसरल्या होत्या. त्याबाबत मुखर्जींच्या कुटुंबियांनी माहिती देताना त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं होतं. भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी मुखर्जी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मुखर्जींनी डाँ. मनमोहनसिंग मंत्रीमंडळात संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाची खाती सांभाळली. लोकसभेतील नेते असतानाच त्यांनी काँग्रेस संसदीय पक्ष आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा प्रमुख ही पदे सांभाळली. त्यांनी जुलै 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवले. प्रणव मुखर्जींना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former president pranab mukharjee health condition is critical stiil on ventilator support