Bharat Ratna Charan Singh: "चोराने पाकिट मारले", वेश बदलून चक्क पंतप्रधान पोहचले होते पोलीस ठाण्यात !

Bharat Ratna Charan Singh: माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकरी कुटुंबासाठी वेचले.
Bharat Ratna Charan Singh
Bharat Ratna Charan Singhesakal

माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकरी कुटुंबासाठी वेचले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ते अनेकदा तुरुंगातही जाऊन आले.

चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बाबूगड छावणीजवळील नुरपूर गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

प्राथमिक शिक्षण गावातच झाले. १९२३ मध्ये त्यांनी आग्रा महाविद्यालयातून बी.एससी आणि इतिहासात एम.ए केले. १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. १९४० च्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९५२ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत उत्तर प्रदेशात संपूर्णानंद मंत्रिमंडळात कृषी आणि महसूल मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.

१९६० मध्ये सी.बी. गुप्ता यांच्या काळात गृह आणि कृषी मंत्रालय देखील सांभाळले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा ध्यास घेणारे चौधरी चरण सिंह यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. १९६७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, खरे परंतु त्यांना लगेच राजीनामा द्यावा लागला. १९७० च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. २८ जुलै १९७९ रोजी चौधरी चरण सिंह देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना भ्रष्टाचार खपत नसे. प्रशासकीय सुधारणांवर त्यांचा भर राहिला आहे. ते शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले गेले.

भारताचे पाचवे पंतप्रधान

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्या असता जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थापन झाले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले आणि चरण सिंह गृहमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र ते २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या कालावधीत समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस (यू) च्या सहकार्याने पंतप्रधान झाले. ते देशाचे पाचवे पंतप्रधान होते.

त्यांचा कार्यकाळ साडेपाच महिन्यांचा होता आणि ते पंतप्रधान या नात्याने एकदाही संसदेत गेले नाही. इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने भूमिका मांडणारे चौधरी यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ मे १९८७ रोजी त्यांचे निधन झाले.

पोलिस ठाणे केले होते निलंबित

पंतप्रधान झाल्यानंतर चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला. या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जाणून घ्यायची असेल तर सामान्य लोकांत मिसळले पाहिजे, असा विचार केला. यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली. सहजासहजी ओळखता येणार नाही, असा वेश धारण करत काही भागांत दौरा केला.

यादरम्यान अशी एक घटना घडली की त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांची झोपच उडाली. एकदा चौधरी चरण सिंह हे इटावा येथील उसराहार पोलिस ठाण्यात पोचले. फाटके कपडे अंगावर होते. ते म्हणाले, साहेब, एका चोराने माझे पाकिट मारले, मला त्याची तक्रार करायची आहे. पण पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला. तरीही चौधरी हे तेथेच थांबले.

तेव्हा एक कर्मचारी आला आणि म्हणाला, तक्रार नोंदविण्यासाठी ३५ रुपये लागतील. यावर चरणसिंह तयार झाले. चरण सिंह यांनी तक्रार अर्जावर स्वाक्षरी करण्याऐवजी एक शिक्का मारला. तो पाहून पोलिस कर्मचारी घाबरले. त्या शिक्क्यावर चौधरी चरण सिंह, पंतप्रधान, भारत सरकार असे लिहले होते. हे पाहून पोलिस ठाणे हादरले. त्यानंतर या ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले.

विधानसभेत पायी अन् ४७० रुपये

शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. ‘शेतकरी, खेडी आनंदी असतील तर देशदेखील आनंदी राहील’, अशी भूमिका ते मांडायचे. उत्तर प्रदेशमध्ये मंत्री असताना ते विधानसभेत पायी जात असत. त्यांच्या स्वीय सहायकांना त्याचा बराच त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांचे स्वीय सहायक हे कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्यांना चौधरी यांच्या घरी पाठवायचे आणि विधानसभेत सोडायचे का, अशी विचारणा करावयास लावायचे.

असा प्रकार बराच काळ चालला. शेवटी त्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी गाडीतून जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते एका खासगी कार्यक्रमासाठी सरकारी गाडीतून गेले. तेथून परतल्यानंतर या प्रवासाचा खर्च वेगळा मांडून ठेव, असे चालकाला सांगितले. हे ऐकून चालक त्यांच्याकडे पाहतच राहिला.

यावर ते म्हणाले, सरकारी दौरा सोडून खासगी कार्यक्रमांना मी जात असेल तर त्या प्रवासाचा पेट्रोलचा खर्च माझ्या खात्यातून केला जाईल. चौधरी चरण सिंह दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा पंतप्रधान झाले. दीर्घकाळ राजकीय कारकीर्द असतानाही त्यांनी मालमत्ता जमविली नाही. त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्या खात्यात केवळ ४७० रुपये होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com