जम्मू-काश्मीर नॅशनल पॅंथर्सचे संस्थापक भीमसिंह यांचे निधन

दीर्घ आजाराने जम्मूतील जीएमसी रुग्णालयात निधन झाले
Bhim singh
Bhim singhSakal

जम्मू - जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स पक्षाचे संस्थापक भीमसिंह (वय ८१) यांचे आज दीर्घ आजाराने जम्मूतील जीएमसी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी जयमाला व लंडनमध्ये राहणारा मुलगा अंकित असा परिवार आहे. उधमपूर जिल्ह्यातील भुगटेरियन या गावाचे ते मूळ रहिवासी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी भीमसिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

लंडन विद्यापीठात त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे, विद्यापीठाच्या युनियनमध्ये १९७१ मध्ये सचिवपदी निवडून येणारे ते पहिले भारतीय ठरले. भीमसिंह यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषविली. पक्षाचे जम्मू आणि काश्मीर युवा आघाडीच्या अध्यक्षपदापासून राष्ट्रीय सरचिटणीसपर्यंतच्या पदांचा यात समावेश होतो. त्यानंतर, १९८२ मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स हा स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढला.

निवडणूक आयोगाविरुद्ध उपोषण

भीमसिंह यांनी १९८८ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, काँग्रेस उमेदवाराकडून ते पराभूत झाले होते. मात्र, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध उपोषण सुरू केले. त्याचप्रमाणे, पुनर्विचार याचिकेवर जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर चार वर्षांनी त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. पण, तोपर्यंत संसदेचे अधिवेशन विसर्जित झाले होते. जम्मू आणि काश्मीर सरकारने आमदार असताना बेकायदा कैद केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ५० हजार नुकसान भरपाईही दिली होती.

जम्मू आणि काश्मीरच्या कल्याणासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणारे तळागाळातील नेते म्हणून भीमसिंह स्मरणात राहतील. त्यांचे वाचन व अभ्यास दांडगा होता. त्यांच्याशी झालेला संवाद मला नेहमीच आठवतो. भीमसिंह यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांचे नातेवाईक व समर्थकांप्रति शोक व्यक्त करतो. ओम शांती.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com