आधी 251 रुपयांत स्मार्टफोन देण्याचे स्वप्न दाखवलं आता ड्रायफ्रूट घोटाळ्यात अटक

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 13 January 2021

देशभरातील लाखो लोकांनी या जाहिरातीला बळी पडत 251 रुपये भरले होते. ही गोष्ट वेगळी की नंतर हा फोन कधीच बाजारात आला नाही.

नवी दिल्ली- मोहित गोयल पुन्हा एकदा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोहित गोयल हा तोच व्यक्ती आहे, ज्याने संपूर्ण भारताला अवघ्या 251 रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा करुन पैसे घेतले होते. देशभरातील लाखो लोकांनी या जाहिरातीला बळी पडत 251 रुपये भरले होते. ही गोष्ट वेगळी की नंतर हा फोन कधीच बाजारात आला नाही. मोहित गोयल हा एक मोठा घोटाळेबाज असल्याचे कालांतराने समोर आले. 

200 कोटींचा घोटाळा
फ्रीडम 251 वाला मोहित गोयल आता पुन्हा नोएडा पोलिसांच्या हाती लागला असून यंदा ड्रायफ्रूट्सचे प्रकरण आहे. मोहित गोयलवर आरोप आहे की, त्याने व्यापाऱ्यांबरोबर ड्रायफ्रूट्सच्या व्यवहारावरुन सुमारे 200 कोटींचा घोटाळा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित गोयल 5 इतर लोकांच्या साथीने नोएडातील सेक्टर 62 मध्ये ड्रायफ्रूट्सची एक कंपनी चालवत होता. त्याचे नाव दुबई ड्रायफ्रूट्स अँड स्पायसेस हब आहे. याचमाध्यमातून त्याने हा मोठा घोटाळा केला आहे. 

हेही वाचा- हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील, सचिन सावंत यांची खोचक टीका

पोलिसांनुसार, सुरुवातीला हे लोक देशातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून चांगली किंमत देऊन ड्रायफ्रूट्स खरेदी केले होते. वेळेवर पैसे देऊन त्यांनी व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकला होता. त्यानंतर ते मोठ्या ऑर्ड्रर देऊ लागले लागले आणि 40 टक्के पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून अडव्हान्स देत होते. नंतरचे पैसे चेकच्या माध्यमातून देणार असल्याचे सांगत. परंतु, नंतर चेक ही बाऊन्स होत असत. अशा पद्धतीने हे लोक व्यापाऱ्यांकडून ड्रायफ्रूट्सची मोठी ऑर्डर घेत असत आणि पूर्ण पैसे देत नसत. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स बाजारात विकून पैसे कमावत असत. 

या कंपनीविरोधात सुमारे 40 तक्रारी पोलिसांत आल्या. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील व्यापाऱ्यांनी ही तक्रार केली होती. पोलिसांनी रविवारी मोहित गोयल आणि त्याचा दुसरा साथीदार ओमप्रकाश जानगिद याला अटक केली. त्याचबरोबर पोलिसांनी एक ऑडी कारसह इतर दोन कार, 60 किलो ड्रायफ्रूट्स आणि काही दस्तावेज जप्त केले. उर्वरित इतर लोक पसार झाले असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. 

हेही वाचा- ‘तुझ्या बंदुकीत किती ताकद आहे पाहू’ म्हणत पोलिसांसमोर गेलेल्या पैलवानावर झाडल्या गोळ्या

मोहित गोयलला 2017 मध्ये रिंगिंग बेल्स घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. रिंगिंग बेल्स घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याने मास्टर फ्रिडम कंपनी नावाने एक कंपनी सुरु केली आणि 2399 रुपयांत मोबाइल आणि 9900 रुपयात एलईडी टीव्ही विकण्यास सुरुवात केली. त्यातही त्याने घोटाळा केला. याप्रकरणी त्याच्यावर नोएडा, गाझियाबाद, जालंधर, पानिपत, गोरखपूर आणि हल्दानीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.  

2018 मध्ये मोहित गोयल आणि मनोज कादियानने एक कंपनी सुरु केली. तिचे नाव फॅमिली ऑफ ड्रायफ्रूट्स प्रा. लि. ठेवले. या कंपनीविरोधात बरेलीमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यानंतरही त्याने इतर नावांनी कंपन्या सुरु केल्या आहेत. मोहित हा उच्च शिक्षित असून त्याने एमबीए केलेले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom 251 scam mastermind mohit goyal arrested again for duping dry fruit traders