मराठमोठ्या नरवणेंनी स्वीकारला लष्करप्रमुख म्हणून पदभार

Narawane
Narawane

नवी दिल्ली : लष्कराचे उपप्रमुख असलेल्या मराठमोठ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद (एम. एम.) नरवणे यांनी आज (मंगळवार) लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. माजी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे आज निवृत्त झाले असून, त्यांना सरसेनाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. 

लेफ्टनंट जनरल नरवणे लष्कराचे स्वातंत्र्यानंतरचे 28वे प्रमुख आहेत. लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल नरवणे हे पूर्व विभागाचे प्रमुख होते. चीनबरोबरच्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी पूर्व विभागावर आहे. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये त्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे, तर पूर्व आघाडीवर एका पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्य भारतातही त्यांनी काम केले आहे. श्रीलंकेत पाठविण्यात आलेल्या भारतीय शांती सेनेत (आयपीकेएफ) त्यांचा समावेश होता, तसेच म्यानमारमधील भारतीय वकिलातीत संरक्षण सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 

लेफ्टनंट जनरल नरवणे हे पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) छात्र असून, डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमीत (आयएमए) त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. जून 1980 मध्ये ते शीख लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये दाखल झाले. जम्मू-काश्‍मीरमधील विशेष कामगिरीबद्दल त्यांना सेना पदकाने (विशेषोल्लेख) गौरविण्यात आले आहे. तसेच, नागालॅंडमधील आसाम रायफल्सचे (उत्तर) महानिरीक्षक (मेजर जनरल) असताना केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विशिष्ट सेवापदक तसेच एका स्ट्राइक कोअरच्या नेतृत्वाबद्दल अतिविशिष्ट सेवा पदकाने लेफ्टनंट जनरल नरवणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com