esakal | 'होय! मी भाजपमध्ये तेव्हा जाईन जेव्हा काश्मीरमध्ये...' गुलाम नबी आझादांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

azad modi

काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले.

'होय! मी भाजपमध्ये तेव्हा जाईन जेव्हा काश्मीरमध्ये...' गुलाम नबी आझादांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत त्यांच्याविषयी भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले. यावेळी शरद पवार यांनी देखील त्यांच्या उत्तुंग कामगिरीबाबत कौतुक केलं. 

त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं तेंव्हा ते देखील भावुक झाले. या भावनिक निरोपानंतर अशा चर्चा सुरु झाल्या की, गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये तरी सामील होणार नाहीयेत ना? या प्रकारच्या वावड्यांना आणि चर्चांना स्वत: गुलाम नबी आझाद यांनीच उत्तर दिलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आझाद यांनी म्हटलं की ते त्या दिवशी भाजपमध्ये जातील जेंव्हा काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल. 

हेही वाचा - PM मोदींनी चीनसमोर टेकले गुडघे ; भ्याडपणे दिली भारतमातेची जमीन; राहुल गांधींचा घणाघात
आझाद यांनी पुढे म्हटलं की, भाजपाच कशासाठी? काश्मीरमध्ये जेंव्हा काळी बर्फवृष्टी होईल तेंव्हा दुसऱ्या कुठल्याही पक्षात मी सामील होईन. जे लोक असं बोलतात अथवा अफवा पसरवतात, ते मला ओळखत नाहीत. राजमाता शिंदे (विजया राजे शिंदे) विरोधी पक्षाच्या उप-नेता होत्या. तेंव्हा त्यांनी माझ्यावर काही आरोप लावले होते. मी उठलो आणि म्हटलं की मी या आरोपाला गांभीर्याने घेतो आहे. आणि सरकारच्या वतीने अटल बिहारी वाजपेयींच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती बनवण्याचा सल्ला देऊ इच्छितो ज्यामध्ये त्या आणि लाल कृष्ण आडवाणी सदस्य असतील. मी म्हटलं की या समितीच्या वतीने 15 दिवसांच्या आत जी शिक्षा सुनावण्यात येईल ती मी मान्य करेन. मी वाजपेयींचं नाव घेतल्याबरोबर त्यांनी येऊन विचारलं का? जेंव्हा मी त्यांना सांगितलं तेंव्हा त्यांनी उभं राहून म्हटलं की मी सदनाची क्षमा मागतो आणि गुलाम नबी आझाद यांची देखील. कदाचित राजमाता शिंदे त्यांना ओळखत नाहीत, मात्र मी त्यांना ओळखतो. 

संसदेत मोदी आणि आझाद का झाले होते भावनिक?
गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत मोदी यांच्या भावनिक होण्यामागचे कारण देखील सांगितले. त्यांनी म्हटलं की, कारण हे होतं की 2006 मध्ये एका गुजराती पर्यटकांच्या बसवर काश्मीरमध्ये हल्ला झाला होता आणि मी त्यांच्याशी बोलत असताना रडलो होतो. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा हवाला देत म्हटलं की आझाद असे व्यक्ती आहेत जे निवृत्त होत आहेत आणि चांगले व्यक्ती आहेत. ते पूर्ण किस्सा सांगू शकले नाहीत कारण त्यांना अश्रु अनावर झाले. आणि मी देखील तो किस्सा सांगताना भावुक झालो. कारण मी 14 वर्षांपूर्वीच्या त्या क्षणांमध्ये गेलो होतो जेंव्हा तो हल्ला झाला होता.