तुम्ही किती कमावता? संसदीय समितीचा गुगल आणि पेटीएमला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

संसदीय समितीने गूगल आणि पेटीएमची चौकशी केली असून यामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. दोन्ही कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक आहे का? किती आहे याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न संसदीय समितीने केला.

नवी दिल्ली - संसदीय समितीने गूगल आणि पेटीएमची चौकशी केली असून यामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. दोन्ही कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक आहे का? किती आहे याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न संसदीय समितीने केला. भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलावरून कंपन्यांना समन्स पाठवले होते. 2019 च्या या बिलावरून काँग्रेसनं चिंता व्यक्त केली होती. 

गूगल आणि पेटीएमच्या अधिकाऱ्यांची कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टवरून चौकशी झाली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. संबंधित कंपन्या टेक्निकल प्लॅटफॉर्मशिवाय फायनान्शिअल सर्व्हिस प्रोव्हायडर आणि अॅडव्हर्टायजरसुद्धा आहेत. गुगल आणि पेटीएमच्या दोन्ही अधिकाऱ्यांना चीनच्या गुंतवणूकीबाबत प्रश्न विचारले. विशेषत: गुगलला चीन लिंकवरून विचारण्यात आलं. गुगलने भारतात कॉर्पोरेट टॅक्स किती भरला आणि गुगल प्ले, युट्यूब या प्लॅटफॉर्मवरून किती कमाई होते यांचीही चौकशी संसदीय समितीने केली. दोन्ही कंपन्यांना संबंधित माहिती लेखी देण्याचे आदेश संसदीय समितीने दिले आहेत.

हे वाचा - भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?

खासदारांनी गुगलला असाही प्रश्न विचारला की, प्रचार साहित्याबाबत ते किती निष्पक्ष असतात आणि त्याची काळजी कशी घेतात. याशिवाय युजर्सच्या डेटा सुरक्षिततेबाबत विचारताना तो डेटा कसा आणि कुठे ठेवला जातो असंही संसदीय समितीने विचारलं आहे. 

गुगल आणि पेटीएम यांच्याआधी  फेसबुक आणि ट्विटरचे प्रतिनिधी संसदीय समितीसमोर हजर राहिले होते. फेसबुकचे अधिकारी गेल्या शुक्रवारी समितीसमोर हजर झाले तर ट्विटर मंगळवारी हजर झाले. पक्षपातीपणाचा आरोप झालेल्या फेसबुकच्या पॉलिसी हेड अंखी दास यासुद्धा संसदीय समितीसमोर हजर राहिल्या होत्या. त्यानंतर अंखी दास यांनी फेसबुकचा राजीनामा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google paytm questioned by parliamentary committee