चिदंबरम म्हणतात, अर्थव्यवस्थेबाबत सरकार पूर्णतः अज्ञानी

नवी दिल्ली : देशभरातील कांद्याच्या दरवाढीविरोधात कॉंग्रेसने गुरुवारी संसदेबाहेर जोरदार आंदोलन केले, यामध्ये ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि अधीररंजन चौधरी हे सहभागी झाले होते.
नवी दिल्ली : देशभरातील कांद्याच्या दरवाढीविरोधात कॉंग्रेसने गुरुवारी संसदेबाहेर जोरदार आंदोलन केले, यामध्ये ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि अधीररंजन चौधरी हे सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार पूर्णतः अज्ञानी असून, आर्थिक समस्यांचे निदान चुकले असल्याने उपचार जीवघेणे ठरले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन आहेत, असा हल्ला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चढवला.

एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी १०६ दिवसांच्या तुरुंगवासातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर आज पहिल्याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढले. रिझर्व्ह बॅंकेने आज पाच टक्के विकासदराचा सुधारित अंदाज जाहीर केल्यावरून चिदंबरम यांनी तोफ डागली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेला सात महिन्यांत विकासदराच्या अंदाजात दुरुस्ती करावी लागली आहे. बॅंकेने फेब्रुवारीत विकासदर ७.४ टक्के राहील असे म्हटले होते. एप्रिलमध्ये त्यात ७.२ टक्के अशी दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी ६.१ टक्के विकासदराचे बॅंकेचे भाकीत होते.

आज हा अंदाज पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेतील ही मरगळ चक्रीय स्वरूपाची असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन सात महिन्यांनंतरही सरकारला या समस्या चक्रीय स्वरूपाच्या वाटत असतील, तर ती मोठी चूक आहे. याचे कारण म्हणजे सरकार दिशाहीन असून, त्यामागे आडमुठेपणामुळे आणि नोटाबंदी, त्रुटींनी भरलेला जीएसटी कर, दहशतवाद, तसेच पंतप्रधान कार्यालयात एकवटलेली नियंत्रण प्रक्रिया या विनाशकारी चुकांचे हट्टी समर्थन कारणीभूत आहे.

अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीबाबत ते म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी विरोधकांच्या सूचना ऐकण्याची कोणाचीही तयारी नाही. आर्थिक रोगाचे निदानच चुकीचे असल्याने उपचारही जीवघेणे ठरू शकतात. अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था आवर्ती स्वरूपाची (सायक्‍लिकल) आहे की संरचनात्मक (स्ट्रक्‍चरल) आहे, हे सरकारमधील लोकांना ठाऊक नाही. या दोन्ही संकल्पनांमधील फरकही त्यांना कळत नसावा. ’’

विकासदर मोजण्याच्या पद्धतीवर माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी नोंदविलेल्या आक्षेपाची आठवण चिदंबरम यांनी करून दिली. या पद्धतीतील त्रुटीमुळे विकासदर पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहण्याची भीती सुब्रह्मण्यम यांनी वर्तविली होती. मोदी यावर मौन आहेत. म्हणूनच ‘द इकॉनॉमिस्ट’सारखी नियतकालिके सरकारला ‘अर्थव्यवस्थेचे नालायक व्यवस्थापक’ म्हणत आहेत, अशा शब्दांत चिदंबरम यांनी फटकारले. 

काश्‍मीरबाबतचा निर्णय अहंकारातून
तिहार तुरुंगात १०६ दिवसांपासून असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जामिनावर मुक्त होताच आपल्या तुरुंगवारीची आणि काश्‍मिरी जनतेला मूलभूत स्वातंत्र्य नसल्याची तुलना करून केंद्र सरकारला आज लक्ष्य केले. सरकारचा काश्‍मीरबाबतचा निर्णय अहंकारातून, तर आर्थिक निर्णय अज्ञानामुळे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

तुरुंगातून सुटका झाल्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी न्यायप्रविष्ट असलेल्या एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहार प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. जामिनाबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व्यापक असल्याची टिप्पणी केली. न्यायालयाने आपल्याला या प्रकरणावर बोलण्यास मनाई केली असल्याचे सांगताना ही तुरुंगवारी राजकीय सूडातून घडल्याचा दावाही आडवळणाने केला. 

चिदंबरम यांनी तमीळ संतकवी थिरुवल्लुवर यांचे वचन उधृत केले. तुमच्याशी चुकीचे वागणाऱ्यांशी चांगले वागा. आम्ही राजकीय सूडाने वागणार नाही. हे मी फक्त माझ्याबद्दल सांगू शकतो. आम्ही आकस बाळगणार नाही. राजकीय सूडाने कोण वागतो आहे हे माध्यमांनी ठरवावे, असे ते म्हणाले. तसेच गांधी कुटुंबीयांची ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था हटविण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आणि गांधी कुटुंबीयांना ‘एसपीजी’ सुरक्षेची गरज नाही किंवा ते अपात्र आहेत, असे सरकारला वाटत असेल, तर त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशाराही दिला. 

तुरुंगवारीने कणखर बनवले!
या १०६ दिवसांच्या तुरुंगवारीने मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आणखी कणखर बनविल्याचा दावा करताना चिदंबरम यांनी मंत्री या नात्याने आपली कामगिरी आणि सद्‌सद्विवेकबुद्धी स्पष्ट होती, याची जाणीव सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, संपर्कात आलेल्या उद्योजक आणि पत्रकारांना आहे, असे स्पष्टीकरण दिले. एवढेच नव्हे, तर ‘तुरुंगातील लाकडी फळीवर उशी न घेता झोपल्याने मस्तक, मान आणि पाठीचा कणा ताठ राहतो. माझा कणा ताठ आहे, माझी मान ताठ आहे आणि माझे मस्तक ताठ आहे,’ अशा शब्दांत त्यांनी दावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com