Coronavirus : देशातील तीस शहरांमुळे सरकार चिंतेत; महाराष्ट्रातील 'या' दोन शहरांचा समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 April 2020

शंभराहून अधिक कोरोना रुग्ण असलेल्या तीस शहरांनी सरकारची चिंता वाढविली आहे. 

नवी दिल्ली - शंभराहून अधिक कोरोना रुग्ण असलेल्या तीस शहरांनी सरकारची चिंता वाढविली आहे. यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली खेरीज महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि ठाण्याचाही समावेश आहे. या शहरांमधील स्थितीबाबत आरोग्य दररोज दोन वेळा आढावा घेतला जात आहे. तेथे चाचण्याची संख्या देखील वाढविली असून संभाव्य वाढते प्रमाण पाहता विशेष रुग्णालये देखील सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील मध्य दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने ३०२९ चा आकडा पार केला आहे. तर पुण्यात ६६० आणि ठाण्यामध्ये ४५० वर रुग्ण पोहोचले आहेत. याच वाढत्या संख्येने सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. मुंबई, पुण्यातील स्थितीचा विचार करून केंद्र सरकारची आंतरमंत्रालयीन पथके राज्याच्या मदतीसाठी या दोन्ही शहरांमध्ये आधीच दाखल झाली आहे. शिवाय गृहमंत्रालयाच्या पातळीवर दररोज दोनदा आढावा देखील घेतला जात आहे. अहमदाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० पोहोचली आहे. तर, सुरत, बडोदा शहरांमधील रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता केंद्राने राज्यांना सज्जतेच्या सुचना दिल्या आहेत.

Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

सुरतमध्ये सध्या १२८ रुग्ण संख्या आहे. तर बडोद्यातील रुग्णांची संख्या १८८ झाली आहे. याखेरीज तेलंगणातील हैदराबादमध्ये ४७२ रुग्ण, मध्यप्रदेशातील इंदूर मध्ये ९१५ रुग्ण आढळले आहेत. अशात इंदूरमध्ये कोरोना संक्रमणामुळे पोलिस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा ओढवलेला मृत्यू देखील सरकारच्या चिंतेचा विषय बनला आहे. राजस्थानात जयपूरमध्ये ५३७, जोधपूरमध्ये २२८, चेन्नईत ३०३, कोलकातामध्ये १८४, भोपाळमध्ये २७७, आग्रामध्ये २४१, लखनौमध्ये १६७ यासोबतच कोईमतूर, आंध्रप्रदेशातील कुरनूल, गुंटूर या जिल्ह्यांमध्येही १०० हून अधिक रुग्ण असल्याने त्यांच्यावर केंद्राने  लक्ष देणे सुरू केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government worried about 30 cities due to spreading coronavirus