
Gyanvapi Masjid सर्वेक्षण पूर्ण; विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा
वाराणसी : न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेत व्हिडीओग्राफी सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्व्हे आज पूर्ण झाला असून एका विहीरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा वकील विष्णु जैन यांनी केला आहे तसेच याच्या संरक्षणासाठी आम्ही दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.
(Gyanvapi Masjid Survey Complete)
या सर्व्हे दरम्यान सापडलेले शिवलिंग हे नंदीमुखी असल्याचं वकील मदन मोहन यादव यांनी सांगितलं असून त्याची लांबी १२ फूट आहे असंही ते म्हणाले. दरम्यान सर्व्हे सुरू असताना कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती.
वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यांनी रविवारी मंदिराचा भाग असलेल्या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले होते असं सांगितलं. आज या मशिदीचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण पूर्ण झाले असून एका विहीरीत शिवलिंग सापडल्याचा दावा वकिलांनी केला आहे. यानंतर शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू असून याआधी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या भिंतीवर स्वस्तिकाच्या खुना आढळून आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यावर काही काळ सर्वेक्षण थांबवण्यात आले होते. कोर्टाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.
दिल्लीतील राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतर महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ज्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा करण्याची परवानगी मागितल्याच्या याचिकेनंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जात होते. त्यालाही मुस्लीम बांधवांकडून विरोध होत होता पण कोर्टाच्या आदेशानुसार कडक पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आले आहे.