
हनुमान जयंतीला ३ राज्यात हिंसाचार; मंदिरावर हल्ला, दगडफेकीत पोलिस जखमी
नवी दिल्ली : हनुमान जयंतीनिमित्त दक्षिणेकडील कर्नाटक राज्यापासून आंध्र प्रदेश आणि दिल्लीपर्यंत (Hanuman Jayanti Violence) समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. कुठे शोभा यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली, तर कुठे हनुमान मंदिराची तोडफोड करण्यात आली. कर्नाटकातील (Karnataka) हुबळी येथे जमावाने गोंधळ घातला.
हेही वाचा: रामनवमीला चार राज्यांत हिंसाचार, गुजरातमध्ये एकाचा मृत्यू
हुबळी येथे पोलिसांवर हल्ला -
हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त लाभू राम यांनी पत्रकारांना सांगितले की, "सुमारे ४० जणांना अटक करण्यात आली असून काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्तव्यावर असलेले आमचे १२ अधिकारी जखमी झाले असून पोलिसांच्या काही वाहनांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, शनिवारी आंध्र प्रदेशातील कुरनूलच्या अल्लूर येथील होलागुंडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्ष आणि कथित दगडफेकीत किमान 15 जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान जयंती मिरवणुकीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक मिरवणूक डीजे वाजवत गाणे वाजवत मशीद ओलांडत असताना दगडफेक झाल्याचे निदर्शनास आले.
आंध्र प्रदेशात दोन गटात राडा -
"विश्व हिंदू परिषदेने (VHP) अल्लूर, कुरनूल येथील होलागुंडा येथे हनुमा जयंती साजरी केली. पोलिसांच्या मनाईनंतरही त्यांनी डीजे वापरला. जेव्हा ते मशिदीजवळ गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना डीजे बंद करण्यास सांगितले. पण, त्यांनी बंद केले. मशिदीसमोर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. यावर मुस्लिम समाजाच्या लोकांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
"पोलिसांनी विहिंपच्या सदस्यांना घटनास्थळ सोडण्यास सांगितले. मिरवणूक मशिदीपासून थोडी दूर गेल्यावर त्यांनी पुन्हा डीजे वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन गटांमध्ये वाद झाला. काही वेळातच तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक झाली. पोलिस दलाने घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवले. दगडफेक सुमारे 10 मिनिटे चालली. आम्ही गोळा केलेल्या फुटेजच्या आधारे 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे'', असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. "या घटनेत 15 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या फुटेजच्या आधारे 20 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिस तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे,'' असे कुरनूलचे पोलिस अधीक्षक म्हणाले.
दिल्लीत हिंसाचार -
राजधानी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागातील जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हिंसाचार उसळला. याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये दगडफेक झाली आणि काही वाहने जाळण्यात आली, असे ते म्हणाले. या हिंसाचारात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि एक उपनिरीक्षक गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत.
पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) उषा रंगनानी यांनी सांगितले की, शनिवारी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), गुन्हेगारी कट आणि दंगलीचे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारात एकूण ९ जण जखमी झाले असून त्या ८ पोलिस आणि एका नागरिकाचा समावेश आहे. सर्व जखमींवर बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका उपनिरीक्षकाला गोळी लागली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ते म्हणाले की जहांगीरपुरी येथे रविवारी सकाळी मोठ्या संख्येने पोलिस दल घटनास्थळी उपस्थित होते आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक जलद टास्क फोर्स देखील तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रित आहे, असं पोलिस उपायुक्तांनी सांगितले.
Web Title: Hanuman Jayanti Violence At Delhi Karnataka Andhra Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..