इंडियन एअरलाइन्सच्या CEO पदी हरप्रीत सिंह, पहिल्यांदाच महिलेला संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

भारताच्या विमान क्षेत्रात इतिहास रचत हरप्रीत एडी सिंह या अलायन्स एअरची पहिली महिला सीईओ बनल्या आहेत. सरकारने हरप्रीत एडी सिंह यांना एअर इंडियाची कंपनी अलायन्स एअरच्या सीईओपदी नियुक्त केलं आहे

नवी दिल्ली - भारताच्या विमान क्षेत्रात इतिहास रचत हरप्रीत एडी सिंह या अलायन्स एअरची पहिली महिला सीईओ बनल्या आहेत. सरकारने हरप्रीत एडी सिंह यांना एअर इंडियाची कंपनी अलायन्स एअरच्या सीईओपदी नियुक्त केलं आहे. हरप्रीत सिंह या सध्या एअर इंडियाच्या एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. सर्वात वरिष्ठ कमांडरमध्ये कॅप्टन निवेदिता भसीन या सध्या ड्रीमलाइनर बोइंग 787 चालवतात. भसीन सिंह यांच्या स्थानी एअर इंडियाच्या नव्या एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर म्हणून हरप्रीत सिंह जबाबदारी सांभाळणार आहेत.

एअर इंडियाचे अध्यक्ष आणि संचालक राजीव बन्सल यांनी शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. त्यात म्हटलं की, पुढचा आदेश येईपर्यंत अलायन्स एअरच्या सीईओ म्हणून हरप्रीत सिंह काम पाहतील. याशिवाय कॅप्टन निवेदिता भसीन यांच्याकडे इतर विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

अलायन्स एअर सध्या PSU असणार आहे. सध्या तरी एअर इंडियासह अलायन्स एअरची विक्री होणार नाही असे समजते. महाराजाला खरेदीदार मिळाला तर त्याचे खाजगीकरण केले जाऊ शकते. तसं झाल्यास एअर इंडियाच्या जुन्या बोइंग 747 ला अलायन्स एअरमध्ये स्थलांतरीत केलं जाईल. 

हे वाचा - पुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख

हरप्रीत सिंह पहिली महिला पायलट आहे ज्यांची निवड 1988 मध्ये एअर इंडियाने केली होती. मात्र त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उड्डाण करू शकल्या नाहीत. मात्र उड्डाण सुरक्षा क्षेत्रात त्या सक्रीय राहिल्या आहेत. सिंह यांनी भारतीय महिला असोसिएशनचं नेतृत्व केलं आहे. 

एअर इंडिया ही 1980 च्या दशकात महिला पायलट नियुक्त करणारी पहिली भारतीय विमान कंपनी होती. कॅप्टन सौदामिनी देशमुख भारताची पहिली महिला कमांडर होती. जगात महिला पायलटचे प्रमाण 2 ते 3 टक्के इतकं आहे तर हेच प्रमाण भारतात 10 टक्क्यांहून अधिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harpreet singh first ceo in indian airlines