CM खट्टर यांच्या विरोधात बळीराजा रस्त्यावर; पोलिसांकडून लाठीचार्ज अश्रूधूर अन् पाण्याचा मारा

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून कृषी कायद्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सरकारने नव्याने लागू केलेला कृषी कायदा रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Haryana Police Stop Farmers March : हरियाणातील करनाळमध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे देखील त्यांच्यावर मारण्यात आले. कर्नाल जिल्ह्यातील कॅमला गावात मुख्यमंत्री 'किसान महापंचायत' या कार्यक्रमाला संबोधित करणार होते. भाजपाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शेतकरी गावाच्या दिशेने कूच करत होते. यादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला.  

पीटीआयच्या वृत्तानुसार, हरियाणा पोलिसांनी रविवारी कर्नाल जिल्ह्यातील कॅमला गावात शेतकऱ्यांविरोधात पोलिसांनी बळाचा वापर केला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधूरांचे गोळे टाकण्यात आले. त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला.

एवढेच नाही तर काठीने त्यांना मारहाण देखील करण्यात आली. कृषी कायदा फायद्याचा आहे, हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला.  

बेदी यू गो ! राज्यपाल किरण बेदींविरोधात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून कृषी कायद्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सरकारने नव्याने लागू केलेला कृषी कायदा रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी 'किसान महापंचायत' या कार्यक्रमाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता. शेतकऱ्यांच्या विरोधाकडे कानाडोळा करुन कडेकोट पोलिस बंदोबस्तात मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅमला गावाच्या दिशेने कूच करणारे शेतकरी हातात काळा झेंडा घेऊन सरकारचा विरोध नोंदवत होते. त्यांना रोखण्यासाठी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ बॅरेकेट्स लावण्यात आली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haryana police use water cannon teargas shells to stop farmers march to karnal