'त्यांच्यासाठी दलित, मुस्लिम आणि आदिवासी मनुष्य नाहीत'; राहुल गांधींची योगींवर टीका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

कोणावर बलात्कारच झाला नसल्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस सांगतात. कारण त्यांना आणि अनेक भारतीयांसाठी ती कोणी नव्हतीच, असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. रविवारी (दि.11) सकाळी टि्वट करुन त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. अनेक भारतीय दलित, मुसलमान आणि आदिवासींना मनुष्य समजले जात नाही. मुख्यमंत्री आणि पोलिसांचीही हीच मानसिकता आहे. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पोलिसांसाठी पीडितेचे काही अस्तित्वच नव्हते. अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. 

कोणावर बलात्कारच झाला नसल्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस सांगतात. कारण त्यांना आणि अनेक भारतीयांसाठी ती कोणी नव्हतीच, असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारावर पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे नाकारले होते. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. 

हेही वाचा- सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न, जगनमोहन यांचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेशातील घटनेमागे विदेशातून कट रचल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांची ही इच्छा आहे. या घटनेबाबत ते कोणतीही कल्पना करु शकतात. पण माझ्या मते एका गोड मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आणि आता तिच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे. 

हेही वाचा- यशवंतरावांच्या साधेपणाचा आदर्श घ्या; राज्यपाल पुरोहित यांचा मराठी अधिकाऱ्यांना सल्ला

राहुल गांधी यांनी 3 ऑक्टोबर रोजी हाथरसला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. घाबरु नका आणि गाव सोडू नका, असे राहुल गांधी पीडित कुटुंबीयांशी बोलताना दिसत असल्याचे एका व्हिडिओत दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras Rahul Gandhi Targets Cm Yogi Adityanath up police