Hathras: पीडित मुलीवर रात्रीच अंत्यसंस्कार का केले? योगी सरकारचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

सकाळ ऑनलाईन
Tuesday, 6 October 2020

हाथरस प्रकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया, टीव्ही आणि वृत्तपत्र माध्यमांवर आक्रमक अभियान चालवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस प्रकरणातील पीडित मुलीवर रात्रीतून अंत्यसंस्कार का केले याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश सरकारला हाच सवाल विचारला. यावर योगी सरकारने उत्तर देताना म्हटले आहे की, पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सकाळपर्यंत वाट पाहिली असती तर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळण्याची शक्यता होती. 

योगी सरकारने हाथरस प्रकरणी शपथपत्र दाखल करुन सर्वोच्च न्यायालयाला सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासची विस्तृत माहिती सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवले असून काही वैयक्तिक स्वार्थ असणाऱ्या शक्ती निष्पक्ष न्यायाच्या मार्गात अडथळे आणत आहेत.

हेही वाचा- पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आता तरी ऐकणार का? प्रियांका गांधी यांचा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सवाल

विशेष म्हणजे यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाची नोटीस मिळण्यापूर्वीच त्यांच्याकडून शपथपत्र दाखल केले आहे. हाथरस प्रकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया, टीव्ही आणि वृत्तपत्र माध्यमांवर आक्रमक अभियान चालवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. 

यापूर्वी राज्याचे पोलिस महासंचालक एच सी अवस्थी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतानाही असाच दावा केला होता. त्या रात्री अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, त्यामुळे नाईलाजाने रात्रीच अंत्यसंस्कार करावे लागल्याचे त्यांनी सांगितले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras Victims Late Night Cremation To Avoid Large Scale Violence In Morning Up Government Supreme Court