कोरोना रोखण्यासाठी सरकारची मोठी घोषणा; देशभरात अघोषित जमावबंदी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 मार्च 2020

महाराष्ट्रातही अन्न आणि प्रशासन विभागाने डॉक्टरांनी सूचना केल्यानंतरच संबंधित रुग्णांना औषध विक्रेत्यांनी कोरोनासंदर्भातील कीट द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणू वेगाने हातपाय पसरू लागला असून, शुक्रवारी (ता.६) भारतात बाधितांची संख्या ३१ वर पोचली. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता सरकारने आणखी ३१ प्रयोगशाळांमध्ये या विषाणूंच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत लोकांना गर्दीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक लावण्यात यावा, तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना राज्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

- संसदेत आत आणि बाहेरही गोंधळ; जिवंत काडतुसे नेणाऱ्यास पकडले!

विद्यापीठ अनुदान आयोगानेही देशातील सर्वच महाविद्यालयांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. विषाणूग्रस्त देशांमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना चौदा दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात यावे, असेही आयोगाने म्हटले आहे.

सध्या मांसाहारी पदार्थांमधून या विषाणूंचा प्रसार होत असल्याच्या अफवा पसरल्यानंतर सरकारने मात्र याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले. महाराष्ट्रातही अन्न आणि प्रशासन विभागाने डॉक्टरांनी सूचना केल्यानंतरच संबंधित रुग्णांना औषध विक्रेत्यांनी कोरोनासंदर्भातील कीट द्यावे, असे निर्देश दिले आहेत. 

- देशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी

सध्या मास्क धारण करण्यावरून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत, लोकांनी या संसर्गाला घाबरून जाण्याचे काही कारण नाही. अव्वाच्या सव्वा किमतीने मास्क विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री 

- कोरेगाव भीमा प्रकरण : आरोपी नवलखा, तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा!​

देशभरातील कोरोनाचे अपडेट्स :-  

- लष्करी रुग्णालयांत विलगीकरण कक्ष 
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती बंद 
- इंदूरमध्ये आणखी दोन संशयित सापडले 
- तमिळनाडूत विशेष नियंत्रण कक्ष 
- विशाखापट्टणमध्ये रुग्णाची चाचणी निगेटिव्ह 
- आंध्र प्रदेशातील रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह 
- पुद्दुचेरी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना 
- चेन्नई विमानतळावर प्रवाशांची काटेकोर तपासणी 
- अमृतसरमधील तेरा इटालियन पर्यटकांना वेगळे ठेवले 
- दिल्लीतील शाळांत सकाळची प्रार्थना रद्द 
- विंग्ज इंडिया-२०२० हा शोही सरकारने पुढे ढकलला 
- गुजरातमधील महिला दिनाचे कार्यक्रम रद्द 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HM Harsh Vardhan takes a big decision on crowd ban due to Coronavirus in India