2021ची जनगणना होणार मोबाईल अॅपद्वारे; अमित शहांची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 23 September 2019

आधार, पासपोर्ट, बँक खाते, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र आदींसाठी एकच 'युनिव्हर्सल कार्ड' वापरणे शक्‍य आहे, असेही सूचक संकेत शहा यांनी दिले.

नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली.

जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे ते महत्त्वाचे साधन आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आधार, पासपोर्ट, बँक खाते, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र आदींसाठी एकच 'युनिव्हर्सल कार्ड' वापरणे शक्‍य आहे, असेही सूचक संकेत शहा यांनी दिले. 

राजधानी दिल्लीतील प्रस्तावित जनगणना भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शहा यांनी ही घोषणा केली. मानसिंह रस्त्यावर बांधण्यात येणारे हे सात मजली व पर्यावरणपूरक जनगणना भवन 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारने ठरविले आहे. आगामी जनगणनेसाठी सरकारतर्फे विकसित होणारे नवे मोबाईल ऍप सर्व अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असेल. कागदी प्रक्रियेकडून डिजिटल प्रक्रियेकडे होणारा हा प्रवास आधुनिक, सुटसुटीत व कमी वेळ लागणारा असेल, असे शहा यांनी नमूद केले. 

या वेळी शहा यांनी, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) देशातील अनेक समस्या संपुष्टात आणण्यास मदत करेल, असे सांगून आसाममध्ये वादात सापडलेल्या या उपक्रमाचे ठाम समर्थन केले. 

शहा म्हणाले, 'देशातील विविध सामाजिक प्रवाह, अखेरच्या पायरीवरील व्यक्तीचा विकास व भविष्यात देशाच्या विकासकार्यासाठीचा जनगणना हा आधार आहे. जनगणनेतूनच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखी योजना सुरू होते. बालिकांचा जन्मदर कमी असणाऱ्या राज्यांत जनजागृती करणे, गर्भपात कायदे कठोर करणे, यांसारखे अनेक प्रयत्न सुरू झाले. त्याचाही आधार जनगणना हाच आहे. सन 2021 मध्ये होणारी जनगणना ही भारताची 16वी जनगणना असेल. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर आमच्या विचार करण्याच्या क्षमतेत बदल होऊ लागला. देशाला समस्यामुक्त करण्याचे नियोजन 2014 मध्येच सुरू झाले आहे.' 

पुढील वर्षापासूनच काम 
यापूर्वीची 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार देशाची एकूण लोकसंख्या 121 कोटी होती. यापुढील जनगणना 2021 मध्ये होईल, असे केंद्र सरकारने यंदा एप्रिलमध्ये जाहीर केले होते. त्यानुतर गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचनाही जारी केली व राज्यघटनेच्या कलम 3 नुसार 2021 मध्ये जनगणना करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर बर्फवृष्टी होणाऱ्या जम्मू-काश्‍मीर व पर्वतीय राज्यांत पुढच्या वर्षी ऑक्‍टोबर 2020 पासूनच जनगणनेचे काम सुरू होणार असल्याचेही सरकारने जाहीर केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- मुलासाठी बनवली मिनी रॉयल इनफिल्ड...

- Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची मोठी खेळी; मुख्यमंत्र्याच्या विरोधात 'हा' तगडा उमेदवार?

- 'पिचडजी लक्ष ठेवा, गाठ अजित पवारांशी आहे'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah said Census of 2021s data will be collected through Mobile App