esakal | आर्मी अधिकारी असल्याचं सांगून 17 महिलांना फसवलं; 6.61 कोटींची 'अशीही बनवाबनवी'
sakal

बोलून बातमी शोधा

impersonating army officer

पोलिसांनी त्याच्याकडून तीन नकली पिस्तूले, सैन्याची तीन जोड्या वर्दी, एक बनावट ओळखपत्र आणि काही खोटी कागदपत्रे जप्त केली आहेत.

आर्मी अधिकारी असल्याचं सांगून 17 महिलांना फसवलं; 6.61 कोटींची 'अशीही बनवाबनवी'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : बनवाबनवी करत लोकांना फसवणारे लोक अनेक असतात. त्यांना ओळखून वेळीच सावध होणे केंव्हाही चांगलेच!  हैद्राबाद पोलिसांनी काल शनिवारी अशा एका व्यक्तीला पकडलं आहे ज्याने सैन्यातील अधिकारी असल्याचा बनाव करुन लग्नाची बोलणी करुन जवळपास 6.61 कोटी रुपये लंपास केले आहेत. त्याने या प्रकारे जवळपास 17 महिला आणि त्यांच्या परिवारांना फसवलं आहे. या व्यक्तीचं वय 42 वर्षे सांगितलं जातंय. सध्या या बनवाबनवी मेजरला पोलिसांनी अटक केली आहे. 

हेही वाचा - नवी संसद 2000 खासदारांसाठी; 861 कोटी रुपयांचा असा आहे प्लॅन
आरोपी मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान हा प्रकाशम जिल्ह्यातील केल्लमपल्ली गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन नकली पिस्तूले, सैन्याची तीन जोड्या वर्दी, एक बनावट ओळखपत्र आणि काही खोटी कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून मिळालेल्या 85 हजार रुपयांशिवाय त्याच्या तीन गाड्याही जप्त केल्या आहेत. 

पोलिसांनी सांगितलंय की, तो फक्त इयत्ता 9 वी पर्यंत शिकला आहे. त्याच्याकडे असलेली पोस्ट ग्रॅज्यूएशनची डिग्री देखील खोटी आहे. त्याच्या पत्नीचं नाव अमृता देवी असं आहे. त्याला मुलगा देखील आहे जो इंटरमिडीएट फायनल इअरचा विद्यार्थी आहे. त्याचा परिवार सध्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहतो. मात्र, तो स्वत: हैद्राबाद येथे येऊन सैनिकपुरी, जवाहरनगरमध्ये राहू लागला. त्याने आपल्या परिवाराला सांगितलं की, त्याला इंडियन आर्मीमध्ये नोकरी मिळाली आहे आणि तो मेजर बनला आहे. 

हेही वाचा - positive story: शिक्षकाची नोकरी सोडून सुरु केला पोळ्या विकण्याचा स्टार्टअप, 30 लाखांचा टर्नओव्हर
पोलिसांनी हे देखील सांगितलं की, त्याने श्रीनिवास चौहान नावाने बनावट आधार कार्ड बनवलं आहे ज्यामध्ये त्याने आपली जन्मतारीख 12-7-1979 च्या ऐवजी 27-7-1986 दाखवली आहे. चौकशीदरम्यान स्पष्ट झालं की तो मॅरेज ब्युरो अथवा त्याच्या ओळखीच्या लोकांद्वारे असे  परिवार शोधायचा ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे आहे. यानंतर तो आपले बनावट ओळखपत्र, फोटो आणि खोटे पिस्तूल या साऱ्या बनवाबनवीच्या माध्यमातून त्या लोकांना आपल्या जाळ्यात फसवायचा. तो स्वत:ला पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडेमीमधून ग्रॅज्यूएट असल्याचे सांगायचा. तो म्हणयचा की तो आर्मीच्या हैद्राबाद रेंजमध्ये मेजर आहे. या बनवाबनवीतून लुटलेल्या पैशांतून त्याने सैनिकपुरीमध्ये एक घर घेतलं होतं. तसेच तीन अलिशान गाड्या आणि ऐशो-आराम करण्यासाठी इतर अनेक साधने विकत घेतली होती. काल शनिवारी या बनवाबनवीचा दि एंड करत पोलिसांनी त्याला अटक केली.