साध्वी प्रज्ञा म्हणते, 'होय, मी बाबरी मशीद पाडली अन् याचा अभिमान'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

साध्वी यांच्या 'या' वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने लगेच साध्वी यांना निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविली.

भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चिखलफेक करुन झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करत नोटीस पाठवली आहे. 

करकरे यांना मी शाप दिल्याने 21 दिवसांत सुतक संपल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावलेले हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. एवढ्यातच साध्वी यांनी असेच काहीसे भडकवणारे वक्तव्य पुन्हा केले आहे. आता त्या म्हणतात, 'बाबरी मशीदचा ढाचा मीच पाडला. बाबरी मशीदीवर चढून मी इतर लोकांना मशीद पाडण्यात मदत करत होते. मी मशीदीच्या छतावर चढून ते तोडले होते. मला अभिमान आहे की देवाने मला ही संधी दिली आणि शक्ती दिली. म्हणूनच मी हे काम केले. आता तेथेच आम्ही राम मंदिर बनविणार.'

एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना राम मंदिराच्या मुद्द्यावर साध्वी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, 'राम मंदिर निश्चितच उभारण्यात येईल. हे मंदिर भव्य असेल. आम्ही मंदिराची निर्मिती करु. कारण आम्ही ढांचा (बाबरी मशीद) ला उध्वस्त करण्यासाठी पण तर गेलो होतो.'

साध्वी यांच्या या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने लगेच साध्वी यांना निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविली. एवढेच नव्हे तर, मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी वी एल कांताराव यांनी सर्वच राजकीय पक्षांसाठी काही सूचना देखील लागू केल्या आहेत. ज्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, 'नेहमी नेहमी निवडणूकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि अपमानजनक भाषेचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल.'

संबंधित बातम्या -

Web Title: I demolished babri masjid controversial statement by sadhvi pragya singh