PM मोदींच्या जवळच्या IAS अधिकाऱ्याने दिला राजीनामा; चर्चांना उधाण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 13 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात कॅडरचे शर्मा, 2014 मध्ये पंतप्रधान कार्यालयासोबत (पीएमओ) जोडले गेले होते.  

मागील वर्षी अचानक शर्मा यांची बदली गडकरी यांच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयात करण्यात आली होती. मोदी गुजारातचे मुख्यमंत्री असतानापासूनच शर्मा त्यांचे जवळचे अधिकारी मानले जातात. 1988 साली आयएएस अधिकारी झालेले शर्मा यांच्या नोकरीचा कार्यकाळ आणखी शिल्लक आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारने शर्मा यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे आणि यासंबंधी सूचनाही प्रकाशित केली आहे. 

नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रज्ञा ठाकूर पुन्हा मैदानात; म्हणाल्या, काँग्रेसने...

सूत्रांच्या माहितीनुसार, शर्मा राजकारणात पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. त्यांना योगी सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन आठवड्यात याबाबत निर्णय येऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला बिगर-जाट दलित वर्गातील अन्य जातींचे समर्थन मिळाले होते. आता संपूर्ण दलित समुदायाला आपल्याकडे ओढण्यासाठी शर्मा यांना डिप्टी सीएम केले जाण्याचा विचार केला जात आहे. योगींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार आहेत. 

सचिव स्तरावरील अनेक जागा रिकाम्या असताना शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक जागा रिकामी झाली आहे. सध्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग, सूचना व प्रसारण मंत्रालय, पेयजल व स्वच्छता, सांख्यिकी व कार्यक्रम क्रियान्वयन विभाग, वस्त्र मंत्रालय आणि खाद विभागात सचिव पदाच्या जागा रिकाम्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ias arvind kumar sharma resign from his post narendra modi