राम मंदिराच्या नावाखाली देणगीची अवैध वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली जावी यासाठी हिंदू संघटना जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली जावी यासाठी हिंदू संघटना जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, एक धक्कादायक माहिती जनपद मुरादाबादमधून समोर आली आहे. येथे राम मंदिर उभारणीच्या नावाखाली कथित हिंदू संघटनांकडून लोकांना लूटलं जात आहे. 

राम मंदिर निर्माणाशी संबंधित मुरादाबादमधील समितीच्या एका पदाधिकाऱ्याने हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर हा आरोप केला आहे. मुरादाबादच्या सिविल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राम मंदिर निधी समर्पण समितीचे मंत्री प्रभात गोयल म्हणाले की, त्यांनी अशा लोकांविरोधात तक्रार केली आहे, जे राम मंदिराच्या नावावाखी देणगीची अवैध वसुली करत आहेत. 

चीनमध्ये आईस्क्रीमलाही झाला कोरोना; बॉक्स बाजारात पोहोचल्याने खळबळ

काही लोक राम मंदिर निर्माणाच्या नावाखाली लोकांकडून अवैध देणगी वसुली करत आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही एफआयआर दाखल केली आहे. हे अभियान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने बनवलेल्या ट्रस्टमार्फत सुरु आहे. अयोध्येचे जे ट्रस्ट आहे त्याचे मंत्री चंपक राय आहेत. विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संबंधित सर्व संघटना या योजनेमध्ये सक्रिय आहेत. 

शनिवारी आमचे कार्यकर्ते जेव्हा कृष्णा नगरमध्ये गेले. तेव्हा त्यांना कळालं की दोन दिवसांपूर्वीच लोकांनी देणगी दिली आहे. त्यांनी यासंबंधी पैसे दिल्याची पावतीही दाखवली. त्यांनी कुणाला देणगी दिली याबाबत विचारणा केली असता त्यांनी पाच-सहा जणांची नावं सांगितली. आम्ही फोन करुन विचारलं असता त्यांनी पैसे गोळा केल्याचं मान्य केलं. पण, मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला नाही, असं प्रभात गोयल म्हणाले

शेतकरी समर्थकांना NIA कडून समन्स; बादल म्हणाले, हेतूपुर्वक त्रास देतंय सरकार

काही लोकांनी राष्ट्रीय बजरंग दलच्या नावावर एक खोटी संघटना बनवली आहे. विश्व हिंदू परिषदेची संलग्न आमची बजरंग दल नावाची संघटना आहे. या संघटेनेशी मिळते-जुळते नाव ठेवून काहीजण फसवणूक करत आहे. आमच्या युवा संघटनेला बदनाम करण्यासाठी अशाच प्रकारच्या नावाची संघटना बनवण्यात आली आहे. त्यांनी खोटी पावतीही छापली आहे. ज्यावर राम मंदिराचा फोटो आहे, असंही गोयल यांनी सांगितलं. 

आमच्या संघटनेची बदनामी करण्यासाठी आणि लोकांची लूट करण्यासाठी काही लोक अशा प्रकारचा धंदा करत असल्याचं आम्हाला कळालं. आम्ही त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांचा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे नाव बदनाम करण्याचा आहे, असंही ते म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal hindu organization ram temple construction fir lodged in moradabad