सर्पदंशावरील संशोधनासाठी स्वतंत्र संस्था हवी

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे पंतप्रधानांना पत्र, संशोधनाची गरज व्यक्त
Himmatrao Bawaskar
Himmatrao Bawaskar sakal

नवी दिल्ली : देशात सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचे मोठे प्रमाण लक्षात घेता यासंबंधी केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) छत्राखाली एक स्वतंत्र संस्था स्थापन करावी, अशी मागणी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सर्पदंशासंबंधी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने त्यावर संशोधन होण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. हिम्मतराव बावस्कर हे गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून विंचू आणि सर्पदंशावर उपचार आणि संशोधन करीत आहेत. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सर्पदंश समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. शेतकरी, आदिवासी, मेंढपाळ यांसारख्या लोकांना सर्पदंशामुळे आपला जीव गमवावा लागतो. दरवर्षी देशात तीस लाख लोकांना सर्पदंश होतो, त्यातील सुमारे साठ हजार जणांना आपला जीव गमवावा लागतो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सध्या ‘आयसीएमआर’च्या छत्राखाली मलेरिया, एचआयव्ही यांसारख्या आजारांवर काम करणाऱ्या संस्था आहेत. परंतु सर्पदंशासंबंधी काम करणारी कोणतीही संस्था नाही. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशात अशा संस्था आहेत. भारतातही त्याची गरज असून, देशातील सर्पदंशांच्या घटनांचे प्रमाण लक्षात घेता, खास सर्पदशांवर एक स्वतंत्र संस्था सुरू करावी, अशी सूचना डॉ. बावस्कर यांनी केली आहे.

प्रशिक्षण देण्याची गरज

सर्पदंशावर अनेक उत्पादक पॉलिव्हेलंट ही सर्पदंशावरील लस तयार करतात. ती काही जातीच्या सापांच्या दंशावर उपयोगी पडते. परंतु सापाच्या अनेक जातीच्या दंशावर ती उपकारक ठरत नाही. मात्र, तरीही सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. अशा रुग्णांना वेळेवर योग्य उपचार आणि प्रतिविष दिले गेले, तर त्यांचा जीव वाचू शकतो. परंतु अनेक ठिकाणी सरकारी दवाखान्यांमधील डॉक्टर, खासगी डॉक्टर यांना सर्पदंशावरील प्रमाणित उपचार पद्धती माहीत नसते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com