भारताने पुन्हा दिला चीनला झटका; 47 चिनी अ‍ॅप्सवर बंदी!

कार्तिक पुजारी
Monday, 27 July 2020

चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनला झटका दिल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली- चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनला झटका दिल्याची माहिती आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने चीनच्या आणखी 47 अॅपवर बंदी आणली आहे. याआधी भारत सरकारने जूनच्या शेवटच्या महिन्यात चिनी कंपनीच्या 59 अॅपवर निर्बंध आणले होते. यामध्ये टिकटॉक या प्रसिद्ध अॅपचाही समावेश आहे. नुकतेच बंद करण्यात आलेले 47 अॅप 59 अॅप्सचे क्लोन आहेत. बंदी आणण्यात आलेल्या अॅप्सची नावे अजून समोर आलेली नाहीत. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

'फ्रान्स टू इंडिया' 5 राफेल लढाऊ विमानांचे भारताच्या दिशेने उड्डाण;...
डीडी न्यूजने केलेल्या एका ट्विटनुसार, सरकारने आपल्या ताज्या निर्णयात 47  चिनी अॅप बंद केले आहेत, हे अॅप यापूर्वी बंद करण्यात आलेल्या अॅप्सचे क्लोन आहेत. शिवाय सरकारने 250 अॅप्सची यादी काढली आहे. या अॅप्सची माहिती काढली जाणार आहे. या अॅप्समुळे वापरकर्त्याची खाजगी माहिती आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. या अॅप्सकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर बंदी आणली जाणार आहे.

बंद करण्यात आलेल्या अॅप्समध्ये पबजी सारख्या प्रसिद्ध गेमचा समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच काही टॉप गेमिंग अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. असे असले तरी सरकारकडून याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 

चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा
सरकारने जूनच्या शेवटी बंदी घातलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक, शेअर इट, यूसी ब्राउजर, हॅलो आणि वीचॅट या लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता. सरकारने दूरसंचार कंपन्यांना या अॅप्सचा अॅक्सेस काढण्यास सांगितले होते. याशिवाय अॅपल आणि गूगलला आपल्या अॅप स्टोअरवरुन बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सना काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान 15 जून रोजी रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने पूर्व लडाखमधील आपली आक्रमकता सुरुच ठेवल्याने भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india again ban 47 chines app