बंदीनंतरही सुरु होती चिनी अ‍ॅप्स; शेजाऱ्यांसोबत कनेक्शन असणाऱ्यांनाही भारत दणका देणार

सुशांत जाधव
शुक्रवार, 24 जुलै 2020

भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर लाइट वर्जनच्या माध्यमातून यातील काही अ‍ॅप्स सुरुच होती. आता ही अ‍ॅप्स देखील प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता चीनशी कनेक्ट असणाऱ्या आणखी काही अ‍ॅप्सला हद्दपार करण्याची तयारी भारत सरकारकडून सुरु आहे.  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय चीनशी संबंधित आणखी काही अ‍ॅप्सवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. हॅलो लाइट, बिगो लाइट, व्हीएफवाय लाइट ही अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्याने दिली. गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात हिंसक झडप झाली होती. यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात चीनविरोधी वातावरण तयार झाले. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरु झाली. देशवासियांचा आक्रोश पाहून भारत सरकारने हॅलो, TikTok सह जवळपास  59 चायनिज अ‍ॅप्सवर बंदी घालत चीनला दणका दिला होता. त्यानंतर आता आणखी काही चिनी अ‍ॅप्स भारत सरकारच्या निशाण्यावर आहेत. 

भाष्य : आत्मनिर्भरतेला असेही "इंधन'

भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर लाइट वर्जनच्या माध्यमातून यातील काही अ‍ॅप्स सुरुच होती. आता ही अ‍ॅप्स देखील प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. चिनी कंपनीची अनेक अ‍ॅप्स बंद करण्यात आली असली तरी सध्याच्या घडीला चिनी कनेक्शन असलेली काही अ‍ॅप्स अजूनही सुरु आहेत. भारत सरकार आता त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. लडाख सीमारेषेवर चिनी सैन्याच्या कुरापती सुरु असल्याने दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण झाले आहेत. चीनच्या विस्तारवादी मानसिकतेचा हाणा मोडण्यासाठी भारताने  व्यापार युद्धाच्या स्वरुपात त्यांना प्रत्युत्तर देण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोरोना रुग्णांसाठी "जम्बो फॅसिलिटी'; लॉकडाउनमध्ये बेडच्या क्षमतेत वाढ

चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या भारतवासियांनी आणि भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे चीनला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भूभागाच्या वादग्रस्त मुद्यावरुन दोन्ही देशांतील उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठका सत्रे रंगली. यात शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याला चीन राजी झाल्याच्या बातम्याही आल्या. पण भारताच्या काही भूभागात चिनी सैन्याकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचीही वृत्त अधून मधून येत असतात. एका बाजूला चर्चेतून तोडगा काढण्याबाबत होकार द्यायचा अन् दुसऱ्या बाजूला आपले मनसूबे पूर्ण करण्याच्या हेतूने हालचाली करायच्या ही चीनची खोड सीमाभागात पाहायला मिळते. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून शक्य त्यापरिने प्रयत्न सुरु आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india ban more mobile apps over links with china lite versions also removed