
अरुणाचल अविभाज्य भागच; भारताने चीनला ठणकावले
नवी दिल्ली : सीमावादावर चीनशी लष्करी पातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पुन्हा एकदा बजावले, की चीनकडून द्वीपक्षीय करारांचे झालेले उल्लंघन आणि पूर्वस्थितीमध्ये बदलाचा एकतर्फी प्रयत्न यामुळेच ताबारेषेवरील तणावाची स्थिती उद्भवली आहे. यासोबतच, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग असल्याचेही ठणकावून सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, की चर्चेवरून तपशीलवार निवेदन आधीच जाहीर केले होते. दोन्ही देशांची कमांडर पातळीवरील वाटाघाटींची १३ वी फेरी १० ऑक्टोबरला झाली.
यात अन्य क्षेत्रातील शांततेसाठी भारताने दिलेल्या रचनात्मक प्रस्तावांना चीनने सहमती दर्शविली नाही आणि नवे प्रस्तावही दिले नाहीत. अर्थात दोन्ही पक्ष संवाद सुरू ठेवणे आणि सीमेवर शांतता स्थैर्य राखण्यावर सहमत आहेत ही सकारात्मक बाब आहे. अपेक्षा आहे की चीनी पक्ष द्विपक्षीय करार, नियमांचे पालन करून पूर्व लडाखमध्ये ताबारेषेसह सर्व शिल्लक मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या चीनला बागची यांनी पुन्हा एकदा फटकारले. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबतची चीनची टिप्पणी आम्ही पूर्णपणे धुडकावली आहे. अरुणाचल हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग असल्याची भूमिका वारंवार चीनला स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. भारतीय नेते इतर राज्यांप्रमाणेच अरुणाचलमध्येही जातात. भारतीय नेत्यांना आपल्याच देशातील एका राज्यात जाण्यावर घेतला जाणारा आक्षेप भारतीय जनतेच्या आकलनापलीकडचा आहे. आपल्याच एका राज्यात उपराष्ट्रपती जातात आणि कोणी तरी त्याला विरोध करतो, हे आपल्यासाठी गंभीर आहे. म्हणून चीनी आक्षेप नाकारल्याचे बागची यांनी सुनावले.
भूतान आणि चीनमध्ये सीमावादावर झालेल्या कराराबाबत भारताने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. याविषयी बागची म्हणाले, की दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराची दखल घेण्यात आली असून भारत यावर जागरूक आहे.सीमावादावर दोन्ही देशांच्या १९८४ पासून वाटाघाटी सुरू आहेत आणि भारताचीही चीनशी सीमावादावर बोलणी सुरू आहे, असे सांगून बागची यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.