भारतात आणखी एका लशीची होणार एन्ट्री; टाटा ग्रुपने सुरु केली तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 January 2021

भारतात कोणत्याही लशीचा वापर करण्यासाठी त्याचे ट्रायल देशातील लोकांवर होणे अनिवार्य आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेत वापरली जाणारी मॉडर्नाची कोरोना लस लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. माहितीनुसार, टाटा ग्रुपची आरोग्य शाखा मॉडर्नाच्या लशीला भारतात आणण्यासाठी कंपनीसोबत चर्चा करत आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स आयसीएमआरसोबत मिळून भारतात मॉडर्ना लशीची क्लिनिकर ट्रायल सुरु करु शकते. असे असले तरी याप्रकरणी वृत्त एजेंसी रॉयटर्सने मॉडर्नाशी संपर्क साधला तेव्हा काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. 

Breaking- भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता

फायझर लशीला मायनस 70 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवण्याची आवश्यकता असते, तर मॉडर्ना कंपनीच्या लशीला साधारण फ्रिजमध्येही ठेवले जाऊ शकते. भारत एक मर्यादित कोल्ड स्टोरेज सुविधा असणारा देश आहे. लशीचे साठवण आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी कोल्ड स्टोरेज सुविधा असणे आवश्यक असते. त्यामुळे मॉडर्नाची लस भारतासारख्या देशासाठी फायद्याची ठरु शकते. 

नोव्हेंबरमधील मॉडर्नाच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायल सांगते की लस 94.1 टक्के प्रभावी आहे आणि याप्रकरणी कोणते गंभीर साईड इफेक्ट्स दिसले नाहीत.  अमेरिकेत डिसेंबरमध्ये आणि यूरोपीय देशांमध्ये जानेवारीमध्ये मॉडर्ना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मॉडर्ना लशीचा डोस आरोग्य कर्मचारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना दिला जात आहे. 

अरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून...

भारतात कोणत्याही लशीचा वापर करण्यासाठी त्याचे ट्रायल देशातील लोकांवर होणे अनिवार्य आहे. सध्या भारतात दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. भारतातील 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत 16 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona moderna vaccine will be introduce by tata group