मोदी सरकारच्या भ्याडपणामुळे भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल- राहुल गांधी

कार्तिक पुजारी
शनिवार, 18 जुलै 2020

पूर्व लडाखमध्ये सीमा भागात भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली- पूर्व लडाखमध्ये सीमा भागात भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लक्ष्य केलं आहे. राजनाथ सिंग यांनी लडाख दौऱ्यावर असताना एक वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत निशाणा साधला आहे. चीनने आपली जमीन बळकावली आहे आणि तरीही भारत सरकार चेम्बरलीन (माजी ब्रिटिश पंतप्रधान) यांच्यासारखं वर्तन करत आहे. यामुळे चीन आणखी मुजोर होईल. भारताला केंद्र सरकाच्या भ्याड कारवाईमुळे मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असं ते म्हणाले आहेत. 

नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट
राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये जवानांशी बोलताना भारताचा इंच भूभागही चीनच्या ताब्यात नसल्याचं म्हटलं होतं. तसेच आतापर्यंत आपली चीनशी जी चर्चा झाली आहे, त्याने वाद मिटायला पाहिजे. पण, कुठंपर्यंत हा वाद निवळला जाईल, याची हमी देता येत नाही. मात्र, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. जगातील कोणतीही शक्ती भारताचा इंच भूभागही आपल्यापासून घेऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते. 

चीनने आपला भूभाग बळकावला नसल्याचं भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितलं आहे. मात्र, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचा हा दावा खोडून काढला आहे. चीनने कमीतकमी 1.5 किलोमीटर भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे, पण केंद्र सरकार जनतेला खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गांधी यांनी वारंवार ट्विट करत या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दक्षिण चीन समुद्रापासून ते हिमालयापर्यंत आम्ही भारतासोबत खंबीरपणे उभे;..
राहुल गांधींकडून चेम्बरलीन यांचा उल्लेख

राहुल गांधी यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान नेविलर चेम्बरलीन यांची तुलना मोदी सरकारशी केली आहे. चेम्बरलीन दुसरे महायुद्ध टाळण्याच्या उद्देशाने जर्मनीचा हुकूमशाह हिटलर याला भेटायला गेले होते. चेम्बरलीन यांना विश्वास होता की जर्मनी चेकोस्लोवाकियावर हल्ला करणार नाही. मात्र, असं झालं नाही आणि एक वर्षाने दुसरे महायुद्ध सुरु झाले. 

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय लडाख आणि जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. 15 जूनच्या भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षानंतर ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 17 जून रोजी लडाखमध्ये गेले आहेत. सिंह यांच्यासोबत संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे त्यांच्यासोबत आहेत. सिंह यांनी यावेळी जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is going to pay a huge price because of GOI cowardly actions said rahul gandhi