भारतात ट्विटर बंदीची शक्यता; केंद्र सरकारने नोटीस पाठवून दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

केंद्र सरकारने ट्विटरला कारणे दाखवा नोटीस जारी केली असून याला 5 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही ट्विटरकून लेह हा चीनचा प्रदेश असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - लडाख मुद्यावरून भारत चीन यांच्यात तणावाचे वातावरण असताना ट्विटरच्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ट्विटरवर भारतात निलंबनाची किंवा ब्लॉक केलं जाण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. लेह हा केंद्र शासित प्रदेशाऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवण्यात आल्यानं केंद्र सरकारकडून ट्विटरला इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी ट्विटर इंडिया विरुद्ध एफआय़आरसुद्धा दाखल केली जाऊ शकते असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ट्विटरकडून भारताच्या एकतेचं आणि अखडंतेचं उल्लंघन कऱण्याचा प्रयत्न होत असल्याचं सरकारकडून म्हटलं जात असल्याची माहिती समोर येत आहे. 

केंद्र सरकारने ट्विटरला कारणे दाखवा नोटीस जारी केली असून याला 5 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही ट्विटरकून लेह हा चीनचा प्रदेश असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांना नोटीस पाठवली होती. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरच्या जागतिक उपाध्यक्षांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान केल्याबद्दल ट्विटरवर कारवाई का करू नये असा प्रश्न विचारला आहे. 

हे वाचा - ट्विटरने हटवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्रोफाइल फोटो

ट्विटरने जर उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. भारताच्या नकाशात छेडछाड केल्याप्रकरणी ट्विटरच्या प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल करु शकतो. यासाठी सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय सरकारकडून माहिती तंत्रज्ञान कायद्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानुसार ट्विटरवर निलंबनाची किंवा ब्लॉक करण्याची कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. 

उत्तर देण्यासाठी ट्विटरला शनिवारपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. वेळेत उत्तर न दिल्यास ट्विटरवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या सार्वभौमत्वार प्रश्न उपस्थित करणं किंवा भारताच्या अखंडतेला बाधा येईल अशी कृती केल्यास अॅप, साइट ब्लॉक केली जाऊ शकते. केंद्र सरकारने विचारलेल्या प्रश्नाला ट्विटरने याआधीच उत्तर पाठवलं असल्याचं कंपनीच्यावतीने सांगण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india govt notice to twitter india for leh map error