कोरोनाचा कहर केव्हा संपेल? सरकार नियुक्त समितीने दिली चांगली बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशात 90 हजारांच्या पुढे रुग्ण सापडत होते. पण, आता कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने कोविड उद्रेकाचा टप्पा पार केला असल्याचा दावा सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केला आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. 

भारताने कोरोना उद्रेकाचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय कोरोना महामारी 2021 च्या डिसेंबरपर्यंत नष्ट होईल, असा दावा समितीने केला आहे. असे असले तरी आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल, असंही सरकारने नियुक्त केलेल्या समितीने म्हटलं आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात 1.05 कोटी कोरोना रुग्ण असतील, पण तोपर्यंत कोरोना महामारी नष्ट झालेली असेल, असं समितीकडून सांगण्यात आलं आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांच्या पुढे गेली आहे.  

काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणार आहे का?, भाजपचा सवाल

भारताने मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केला नसता, तर आतापर्यंत 25 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले असते, असंही समितीने म्हटलं आहे. सध्या देशात 1.14 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनासंबंधी माहितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीची नेमणूक केली होती.                             

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 61 हजार 871 रुग्णांचे निदान झाले असून 1033 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 7 लाख 83 हजार 311 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 65 लाख 97 हजार 210 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

रोज देशात हजारो कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत मागील तीन आठवड्यांपासून वारंवार घट झाल्याचे दिसले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशात जवळपास 15 टक्के (झालेल्या चाचण्यांच्या) कोरोना रुग्ण उपचार घेत होते. सकारात्मक बाब म्हणजे मागील तीन आठवड्यांत 4 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे सध्या देशात 10.7 टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशात सध्या कोरोनावरील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली गेली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Has Crossed Covid Peak Says Government Appointed Panel

Tags
टॉपिकस
Topic Tags: