आता ठरलं! राफेल विमानांची डिलिव्हरी लवकरच होणार

Rafale_Fighters
Rafale_Fighters

नवी दिल्ली : सध्या शेजारील राष्ट्रांसोबत धुमश्चक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक अशी बातमी पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राफेल विमानांविषयीच्या बातम्या माध्यमातून ऐकण्यात वाचण्यात येत होत्या. मात्र, सर्व देशवासियांना प्रतीक्षा असलेली राफेल विमाने लवकरच भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.  

पुढील महिन्यात म्हणजे जुलै अखेरपर्यंत जवळपास सहा राफेल विमाने भारतात दाखल होण्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. लांब पल्ल्यावर हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणाऱ्या राफेल या लढाऊ विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची क्षमतादेखील वाढणार आहे. तसेच राफेल भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर शत्रूच्या मनात नक्कीच धडकी भरणार आहे. 

फ्रान्समध्ये भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू असून जुलैअखेरपर्यंत आम्हाला सहा राफेल विमाने मिळू शकतील. तसेच ही विमाने सर्वार्थाने सुसज्ज असतील आणि भारतात आल्यावर ती काही दिवसातच कार्यान्वित केली जातील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. 

दरम्यान, अंबाला हवाई दल स्थानकात तीन ट्विन सीटर ट्रेनर राफेल विमाने ठेवण्यात येणार आहेत, जो की राफेल या लढाऊ विमानांचा भारतातील पहिला तळ असेल. तर राफेल विमानांचा दुसरा तळ पश्चिम बंगालमधील हशिमारा या ठिकाणी असणार आहे. राफेल विमाने १५० किमीपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकतात. आवश्यकतेनुसार या विमानांना फ्रान्समधून भारतात आणले जाईल. तसेच हे विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या वैमानिकांची संख्या लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरून चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आलेली ही वार्ता सर्व भारतीयांसाठी दिलासादायक आहे. जगभरात कोरोनाचे संकट घोंगावत असतानाही भारतीय हवाई दलाने राफेलसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम घेतले. जुलैच्या मध्यापर्यंत विमाने देशात कोणत्या दिवशी दाखल होतील, याची तारीख निश्चित केली जाणार आहे. 
 
राफेल विमाने फ्रान्सहून थेट भारतात दाखल होऊ शकली असती. मात्र, लहान कॉकपीटच्या आत बसलेल्या वैमानिकांसाठी १० तासांचा प्रवास खूप तणावपूर्ण होऊ शकतो, यामुळे ही विमाने टप्प्याटप्प्याने आणली जाणार आहेत. सात भारतीय वैमानिकांच्या पहिल्या तुकडीने राफेलचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. भारत आणि फ्रान्समधील लॉकडाउन उठल्यानंतर वैमानिकांची दुसरी तुकडी फ्रान्सला रवाना होईल. 

तत्पूर्वी, सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांचा करार केला होता. या लढाऊ विमानांसाठी भारताने ६० हजार कोटी रुपये मोजले आहेत. तत्कालीन एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी भारतातर्फे वाटाघाटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. लांब पल्ल्यावर हवेतून मारा करणारी राफेल विमाने भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये नक्कीच धडकी भरवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com