
Soldier Catches Pigeon with Suspicious Letter: जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यातील आरएसपुरा येथील सीमावर्ती भागात सुरक्षा दलांनी एका कबुतराला पकडले आहे, ज्याच्या पंजात एक धमकीचे पत्र बांधलेले होते. या पत्रात आयईडी स्फोटाने जम्मू रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
सध्याच्या धोक्याच्या आणि भारतविरोधी कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्था या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत. तर, हे एक खोडसाळ कारस्थान होते की सुनियोजित कट होता याचा तपास सुरक्षा दल करत आहेत.
तर, 'अशा घटनांना हलक्यात घेता येणार नाही. कबुतराला विशेष प्रशिक्षण देऊन सीमेपलीकडून पाठवण्यात आले असण्याची शक्यता आहे.' असं सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. याशिवाय या घटनेनंतर जम्मू रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅकभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथके तैनात केली आहेत. कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी स्थानिक पोलिसांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
कबुतराला पकडल्यानंतर, पोलिस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात दक्षता वाढवली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानमधून आलेलं हे कबुतर १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता कटमारिया परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आलं होतं.
कबुतराच्या पंजाला बांधलेल्या पत्रात उर्दू आणि इंग्रजीमध्ये धमकीचा संदेश लिहिलेला होता, ज्यामध्ये 'काश्मीर स्वातंत्र्य' आणि 'वेळ आली आहे' असे शब्द लिहिलेले होते. तर लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तान यापूर्वीही भारतीय सीमेवर फुगे, झेंडे आणि कबुतरांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे संदेश पाठवत आहे. परंतु पहिल्यांदाच इतक्या गंभीर धमकीचा संदेश कबुतरासह पकडण्यात आला आहे.