कोरोना लशीच्या वाटपाची तयारी सुरू; पंतप्रधान मोदींनी केल्या सूचना 

टीम ई-सकाळ
Saturday, 17 October 2020

ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. त्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतात सुरू आहे. हैदराबादच्या भारत बायोटिक या फार्मा कंपनीच्या लशीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. 

नवी दिल्ली : भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या देशात ऍक्टिव पेशंट्सची आणि नव्याने लागण झालेल्यांची संख्या कमी होत असली तरी, धोका टळलेला नाही. भारतात या महिन्यापासून हिवाळा सुरू होत आहे. हिवाळ्यात कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्यामुळं सगळ्यांच लक्ष कोरोनाच्या लशीकडं लक्ष लागलंय. पंतप्रधान मोदी यांनी आज, कोरोनाच्या लस वितरणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली असून, वाटपासाठी सूचनाही केल्या आहेत. या प्रक्रियेचे वेळोवेळी अपडेट्स देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 

आणखी वाचा - 'भूकबळीत भारताची दैना; खास लोकांचे खिसे भरण्यात मोदी बिझी'

काय आहे परिस्थिती?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लढ्यात पुढचे दोन महिने अतिशय महत्त्वाचे आहेत, असं म्हटलं होतं. कारण, कोरोनाची लस या दोन-तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर हिवाळ्यामुळं धोकाही आहे. अशा परिस्थितीत कोरोना होऊ नये यासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. अशापरिस्थितीत कोरोनाच्या लशीच्या वितरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतात कोरोनाच्या दोन लशींचं संशोधन युद्धपातळीवर सुरू आहे. ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. त्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतात सुरू आहे. हैदराबादच्या भारत बायोटिक या फार्मा कंपनीच्या लशीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे भारताने आता लस वितरणाची यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा - कोरोना लढाईत अडीच महिने महत्त्वाचे 

काय घडले बैठकीत?
बैठकीत पंतप्रधान मोदींनी कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्तीला लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी पोहोचवली जाईल? त्याचे काय नियोजन आहे? याचा पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला. देशात आपण, सार्वत्रिक निवडणुका घेतो तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपल्या देशात जशी यंत्रणा काम करते, त्याचा विचार केल जावा, असं मत पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत नोंदवलं. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 (NEGVAC)यांच्या वतीने कोरोना लशीचे कोल्ड स्टोअरेज, वितरण आणि व्यवस्थापन याची एक ब्लू प्रिंट तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने या वेळी देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india preparing covid vaccine distribution pm narendra modi