esakal | भारत आर्थिक मंदीच्या दिशेनं; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी -7.5 टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

GDP

आधीच कोरोनाने दणका दिलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी घरघर लागल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2021 - 21 च्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. 

भारत आर्थिक मंदीच्या दिशेनं; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी -7.5 टक्क्यांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आधीच कोरोनाने दणका दिलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी घरघर लागल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2021 - 21 च्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे.  यामध्ये सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीच्या जीडीपीचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी - 7.5 टक्के इतका राहिला. शुक्रवारी सांयकाळी सरकारने जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध केली. गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाल्याने आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष होते. 

पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी - 23.9 टक्के घसरण झाली होती. आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं दिसत आहे. मात्र देश अजुनही आर्थिक मंदीच्या दिशेने जात आहे. दोन तिमाहीमध्ये जर जीडीपी - राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.

हे वाचा - सोनं पुन्हा स्वस्त; ऑगस्टमध्ये उच्चांकी दरानंतर आतापर्यंत 8 हजार रुपयांची घसरण

रेटिंग एजन्सींनी दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीत 10 ते 11 टक्के घसरण होईल असा अंदाज वर्तवला होता. आरबीआय़ने आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.6 टक्के घसरण्याची शक्यता व्यक्त केली होती. तर मूडीजने 10.6 टक्के, केअर रेटिंगने 9.9 टक्के, क्रिसिलने 12 टक्के, इक्राने 9.5 टक्के आणि एसबीआय रिसर्चने 10.7 टक्के घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेसह देश आणि परदेशातील आर्थिक संस्थांनी कोरोना व्हायरसमुळे सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर नकारात्मक राहील असा अंदाज वर्तवला होता.  मार्चच्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढ 3.1 टक्के इतकी होती. यामुळे गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2019-20 मध्ये जीडीपी वाढ फक्त 4.2 टक्के इतकी राहिली होती. 

हे वाचा - कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ

गेल्या काही वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचं दिसत आहे. मात्र गेल्या तिमाहीतील आकडे गेल्या काही दशकांमधील सर्वाधिक खराब असू शकतात. कारण एप्रिल ते जून याकाळात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे अर्थव्यवस्थासुद्धा काही प्रमाणात ठप्प झाली होती.