लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने चीनी सैनिकाला पकडले!

वृत्तसंस्था
Saturday, 9 January 2021

पीपील्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक सकाळच्या सुमारास भारतीय हद्दीत आला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने त्याला ताब्यात घेऊन नियमांनुसार त्याची चौकशी केली जात आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून सतत तणावाचे वातावरण राहिले आहे. या पार्श्वभूमीवरच पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल परिसरात भारतीय सैन्याने एका चीन सैनिकाला ताब्यात घेतलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक भारतीय हद्दीत कसा आला याची चौकशी सुरू झाली आहे.

भारतीय सैन्याने त्याच्याकडे चौकशी केली असता तो चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती मिळाली आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सेनेने चीनला संबंधित सैनिकाबद्दल कळविले आहे. या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून उद्या पर्यंत त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाईल. 

Breaking:भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित

मिळालेल्या माहितीनुसार, पीपील्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक सकाळच्या सुमारास भारतीय हद्दीत आला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने त्याला ताब्यात घेऊन नियमांनुसार त्याची चौकशी केली जात आहे. कोणत्या कारणासाठी तो भारतीय हद्दीत आला, यामागे काय कारण होते का? अशा सर्व  प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत आहे. 

यापूर्वीही एका चीनी सैन्याला पकडले होते
भारतीय सीमेच्या हद्दीत चीनी सैनिक आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही एका चीनी सैनिकाला पकडण्यात आले होते. पण काही दिवसातच त्याला परत चीनच्या ताब्यात देण्यात आले. 

बँकेनं पैसे कापले म्हणून अंथरुण-पांघरुन घेऊन कस्टमर शाखेतच बसला आंदोलनाला​

पूर्व लडाख आणि एकूणच भारत-चीन सीमेवर गेल्यावर्षीपासून तणावाचे वातावरण राहिले आहे. दोन्ही देशांनी लडाखमधील जमिनीवर आपला हक्क दाखवला आहे. तसेच लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर अनेकवेळा चर्चा करण्यात आली असून अजूनही काही तोडगा निघालेला नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग लेक भागात गोळीबारच्या घटना घडल्या होत्या. भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर दिले होते. पँगाँगच्या फिंगर फोर परिसरात चीन सैन्य माघार घेत नसल्याने तेथील महत्त्वाच्या टेकड्या ताब्यात घेत भारतीय सैन्याने चीनच्या हालचालींवर लक्ष राहिल अशी व्यवस्था उभी केली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army apprehends Chinese soldier in Chushul sector Eastern Ladakh