लष्कराने परत धाडला चीनचा सैनिक; वाट चुकून घुसला होता भारतीय हद्दीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

भारतीय सेनेने पूर्व लडाखमध्ये शुक्रवारी पकडलेल्या चीनच्या सैनिकाला आज पुन्हा चीनकडे सुपूर्द केलं आहे.

नवी दिल्ली : भारतीय सेनेने पूर्व लडाखमध्ये शुक्रवारी पकडलेल्या चीनच्या सैनिकाला आज पुन्हा चीनकडे सुपूर्द केलं आहे. भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. हा चीनी सैनिक 8  जानेवारी रोजी चुकून वास्तविक नियंत्रण रेषा पार करुन भारतीय सीमा हद्दीत आला होता. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सैनिकाला शुक्रवारी सकाळी पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील भागात भारतीय सैन्याकडून पकडलं गेलं. चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषा पार करुन भारतीय हद्दीत आला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमध्ये सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी चुशूल-मोल्दो सीमेच्या ठिकाणी या सैनिकाला परत चीनकडे सोपवलं गेलं.

भारतीय सैन्याने शुक्रवारी वास्तविक नियंत्रण रेषा पार करून पूर्व लडाखच्या  पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर भारतीय भूभागावर चिनी सैनिकाला पकडलं होतं. चौकशीत या सैनिकाने सांगितलं होतं की त्याचा रस्ता चुकला होता. सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सीमेवर हा तणाव कायम आहे. 

हेही वाचा - चीन नरमला; कोरोना उत्पत्तीविषयी अभ्यास करणाऱ्या WHO टीमला दिली देशात एंट्री

बीजिंगमध्ये चीनच्या सेनेनेही सांगितलं होतं की त्यांचा एक सैनिक चीन-भारत सीमावर्ती भागात भटकला होता. चिनी सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं  होतं की, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाचा अंधारामुळे आणि बिकट भौगोलिक परिस्थितीत रस्ता भटकला  होता. यासंबंधात भारताला सूचना दिली गेली आहे. भारतीय सैन्य हरवलेल्या चिनी सैनिकाचा शोध आणि त्याला वाचवण्यात मदत करु शकतं, असं त्यांनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army The Chinese PLA soldier handed back to China at Chushul-Moldo