धक्कादायक! भारतीय पत्रकाराने चीनला पुरवली गोपनीय माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये राजीव शर्मा यांनी 7 सप्टेंबरला एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेसंबंधी काही गोपनीय कागदपत्रं सापडली आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिस स्पेशल सेलने गोपनीयतेचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुक्त पत्रकार राजीव शर्मा यांना ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत अटक केली आहे. राजीव शर्मा यांच्याकडे देशाच्या सुरक्षेसंबंधी काही गोपनीय कागदपत्रं सापडली आहेत. आता त्यांच्याकडे ही कागदपत्रे कुठून आली आणि ते या कागदपत्रांचं काय करणार होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचा तपास सध्या दिल्ली पोलिस करत आहेत. 

गोपनीय माहिती चीनला देण्यात आल्या प्रकरणी शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. एक चिनी महिला आणि तिचे नेपाली सहकारी यांनाही अटक करण्यात आली. या महिलेने शर्मा यांना शेल कंपन्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैसा पुरवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पत्रकार राजीव शर्मा यांनी याआधी युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, दि ट्रिब्यूनसोबत काम केलं आहे. नुकतंच त्यांनी ग्लोबल टाइम्ससाठी एक आर्टिकलसुद्धा लिहिलं होतं. दिल्ली स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितलं की, राजीव शर्मा यांना दिल्ली स्पेशल सेलनं दक्षिण पश्चिम विभागातून अटक केली होती. त्यांना दुसऱ्यादिवशी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राजीव शर्मा यांच्याकडे सुरक्षेशी संबंधित कागदपत्रं सापडली आहेत. 

राजीव युट्यूबवर किष्किन्धा नावाचे चॅनेल चालवतात. अटकेच्या दिवशी त्यांनी दोन व्हिडिओ अपलोड केले होते. त्यातील एक आठ मिनिटांचा असून चीन अजुनही खोडसाळपणा करू शकतो असं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी भारत आणि चीनच्या सद्यपरिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. भारत आणि चीन यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही शांतता निर्माण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसंच मॉस्कोत झालेल्या चर्चेने काही सुटेल याची खात्री नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - देशात अल कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

चिनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये राजीव शर्मा यांनी 7 सप्टेंबरला एक आर्टिकल लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, 5 मे रोजी रात्रीपासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडायला सुरु झाले. यामुळे एकाच दणक्यात गेल्या काही वर्षांतील सर्व संबंधांना हानी पोहोचली. सध्याचे संकट 1962 नंतर दोन्ही देशांसाठी मोठा धोका आहे. सर्व सामान्य लोकांसाठी एक चांगलं आणि शांतता असलेलं भविष्य निर्माण करणं हा उद्देश दोन्ही देशांचा असायला हवा.

गेल्या वर्षी इस्रायलचे स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून ज्या लोकांची हेरगिरी होत होती त्यात राजीव शर्मा हेसुद्धा एक होते. तेव्हा इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राजीव शर्मा यांनी सांगितंल होतं की, 29 ऑक्टोंबरच्या रात्री मला एक मेसेज मिळाला. त्यामध्ये माझा फोन हाय रिस्कमध्ये असू शकतो असं म्हटलं होतं. मला पहिला कॉल 15 ते 20 दिवस आधी कॅनडातील एका एनजीओतून आला होता आणि फोन बदलण्यास सांगितलं होतं असा दावाही त्यांनी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian journalist rajiv sharma arrested by delhi special cell under osa