esakal | रेल्वे 21 सप्टेंबरपासून सोडणार क्लोन ट्रेन्स; प्रवाशांना मिळणार दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Clone Trains

रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेंची संख्या वाढेल आणि कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना फार झगडावे लागणार नाही.

रेल्वे 21 सप्टेंबरपासून सोडणार क्लोन ट्रेन्स; प्रवाशांना मिळणार दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात ठप्प झालेली रेल्वे आता हळू हळू सुरु करण्यात य़ेत आहे. यासाठी रेल्वेकडून काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक मार्गांवर प्रवासासाठी अधिक रेल्वे सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत असताना भारतीय रेल्वेने 'क्लोन ट्रेन्स' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून 21 सप्टेंबरपासून 20 स्पेशल क्लोन ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेंची संख्या वाढेल आणि कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना फार झगडावे लागणार नाही. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लोन ट्रेन्सची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.  


क्लोन ट्रेन्स म्हणजे काय?
क्लोन ट्रेन या आधीच्याच ट्रेन्सच्या नावाने आणि त्यानुसारच चालतात. तसंच ज्या नावाने या ट्रेन्स सुरु केल्या आहेत त्या रेल्वे ज्या मार्गावर धावतात त्याच मार्गावरून क्लोन ट्रेन चालवल्या जातात. काही मार्गावर जादा रेल्वे सोडण्याची मागणी होत असेल तर त्यासाठी या क्लोन ट्रेन सोडल्या जातात. रेल्वे मार्गावर नविन रेल्वे वाढवण्याऐवजी आधीच असलेल्या रेल्वेंच्या नावाने त्याच मार्गावर दुसरी ट्रेन वाढवली जाते. 

हेही वाचा - खासगी कंपन्यांना भाडे ठरवता येणार; रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांची माहिती


रेल्वेमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील. महत्वाचं म्हणजे या रेल्वेचा आधीच्या रेल्वेपेक्षा वेगवान असतील. प्रवासात रेल्वे कमी ठिकाणी थांबेल. क्लोन ट्रेन पूर्णपणे थर्ड एसी असतील आणि मूळ ट्रेनच्या वेळेपेक्षा लवकरच ती सोडली जाईल. या ट्रेन त्याच मार्गावर सोडल्या जातील ज्या मार्गावर प्रवाशांकडून  रेल्वेची मागणी अधिक आहे आणि प्रवाशांची वेटींग लिस्ट देखील खूप आहे. 

क्लोन ट्रेनसाठी दहा दिवस आधीपासूनच रिझर्वेशन सुरु होईल. रेल्वेने असं जाहिर केले आहे की, या 20 ट्रेनपैकी 19 ट्रेनच्या प्रवासासाठी एक्स्प्रेसचे भाडे घेतले जाईल. तर लखनऊ ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या क्लोन ट्रेनचे भाडे हे जनशताब्दी एक्स्प्रेसइतके असेल.  

हेही वाचा - ‘पेटीएम’-गुगल वादावर पडदा

रेल्वेने या 20 क्लोन ट्रेन्सची लिस्ट जाहिर केली आहे. यामधील अधिकतर रेल्वे या बिहार मार्गावर धावणार आहेत. लॉकडाऊन दरम्यानपासून भारतीय रेल्वेने देशभरात स्पेशल ट्रेन्स सोडल्या आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याबरोबरच रेल्वेदेखील आपल्या रुळावर परतत असल्याचे दिसून येत आहे.