दहशतवाद्यांच्या बोगद्याचा बीएसएफने लावला शोध; पाकच्या बाजूला 200 मी. अंतरापर्यंत आत गेलं सैन्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

हा बोगदा दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार केला गेला होता.

नवी दिल्ली : अलिकडेच भारतीय सैन्याने एक धाडसी ऑपरेशन केलं. यामध्ये पाकिस्तानच्या बाजूला असणाऱ्या एका जमिनीतील बोगद्याचा शोध घेत सैन्य 200 मीटर आतपर्यंत गेलं. याठिकाणी बोगद्याचे दुसरे टोक होते. हा बोगदा दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार केला गेला होता. याबाबतची माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगतिलं की, भारतीय सुरक्षा दल जवळपास 200 मीटर आतपर्यंत पाकिस्तानच्या बाजूला गेलं होतं. दहशतवादी या बोगद्याच्या वापर भारतात घुसखोरी करण्याच्या उद्देशाने करतात. 

हेही वाचा - शर्ट न घालताच सुप्रिम कोर्टात हजर; कोर्टाने झापझाप झापलं

जम्मू काश्मीरमधील सांबा भागातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ 22 नोव्हेंबर रोजी हा बोगदा सापडला होता. 150 मीटर लांबीचा हा बोगदा दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात केलेल्या एका ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी मारलेल्या दहशतवाद्यांकडून काही साहित्य जप्त केलं  होतं. यामध्ये एका मोबाईल फोनमधील माहितीच्या आधारे हा बोगदा शोधण्यात आला. हा बोगदा बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईद्वारे शोधला गेला. 

हेही वाचा - सगळ्यांना लसीकरण गरजेचे नाही; आयसीएमआर

बीएसएफचे महानिदेशक राकेश अस्थाना यांनी मंगळवारी स्थापना दिवसाच्या निमित्ताने एका स्पेशल ऑपरेशनबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, 22 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांद्वारे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मोबाईल फोनमधील माहितीच्या आधारे या बोगद्याचा शोध लागला. दहशतवाद्यांनी या बोगद्याच्या माध्यमातून सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीची योजना  बनवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांद्वारे घुसखोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या या बोगद्यामध्ये सैनिक जवलपास 150 फुटापर्यंत आत गेले. तिथे त्यांना बिस्कीट आणि इतर खाण्याचे सामानही प्राप्त झाले. या पॅकेटवर लाहोरमधील कंपनी मास्टर क्यूजीन कपकेकचे नाव देखील होते. पॅकेटवरील पॅकींगची तारीख मे,2020 आमि एक्स्पायरी डेट 17 नोव्हेंबर 2020 होती. 19 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian security forces 200 meters inside Pakistan tunnel terrorists infiltrate