परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मतदान करता येणार ? निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

हा प्रस्ताव मान्य झाल्यास परदेशातील भारतीय नागरिकंनाही मतदान करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

नवी दिल्ली- प्रवासी भारतीय मतदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डाक मतदान प्रणालीची (इटीपीबीएस) सुविधा देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने तयार केला आहे. आतापर्यंत ही सुविधा सैन्यदलातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. हा प्रस्ताव मान्य झाल्यास परदेशातील भारतीय नागरिकंनाही मतदान करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. 

कायदा मंत्रालयातील विधिमंडळ सचिवांना 27 नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या एका पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सैन्य दलातील मतदारांसाठी इटीपीबीएसच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ही सुविधा परदेशी मतदारांनाही दिली जाऊ शकते, असा विश्वास वाटतो.  आगामी आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुड्डुचेरी विधानसभा निवडणुकीत ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगाची तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी झाली आहे. या राज्यात पुढील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

हेही वाचा- व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनंतर पुन्हा संसर्ग; दुसरी लाट येण्याची चिन्हे

परदेशात राहणाऱ्या अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांकडून निवडणूक आयोगाला सातत्याने मतदानाचा अधिकार मिळण्याची मागणी केली जात असत. मतदानासाठी भारतात येऊ शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मतदानाला भारतात येण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर शिक्षण आणि नोकरीमुळे ते देशही सोडू शकत नाहीत, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा- 13 फूट मगरीने चलाखीने केली बदकाची शिकार; व्हिडिओ होतोय व्हायरल

कायदा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड-19 शी निगडीत प्रोटोकॉलमुळे समस्या आणखी किचकट झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच सक्षम मतदारांना मतदानाच्या संधीसाठी पर्याय शोधावे लागतील. सध्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांचे नाव ज्या मतदारयादीत आहे, तिथे मतदान करण्यासाठी परवानगी आहे. इटीपीबीएस प्रणालीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सैन्य कर्मचाऱ्यांना मत पत्रिका पाठवली जाते. ते ती मतपत्रिका डाऊनलोड करतात आणि एका विशेष लिफाफ्यात आपल्या मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवतात. नियमानुसार ही मत पत्रिका निवडणूक अधिकाऱ्याकडे मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. 
हेही वाचा- मच्छीमाराला मिळाली व्हेल माशाची उलटी; रातोरात झाला कोट्यधीश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians living abroad also be able to vote The Election Commission made a proposal