भारतातील कोरोना साथीचा सर्वांत वाईट काळ संपुष्टात - प्रकाश जावडेकर

Prakash-Javadekar
Prakash-Javadekar

नवी दिल्ली - कोरोना साथीचा भारतातील सर्वांत वाईट काळ संपुष्टात आला आहे, असा दावा करतानाच या महामारीवर प्रभावी लस शोधली जात नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेचे काटेकोर पालन करणे या ‘न्यू नॉर्मल’ सवयींचे पालन कायमस्वरूपी अंगवळणी पाडून घ्यावे लागेल, असे केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी आज सांगितले.

कोरोनाचे संकट संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर यासारख्या नियमांचे पालन करावेच लागेल, असे प्रकाश जावडेकर यांनी आज नमूद केले. ते म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईच्या व्यवस्थापनात भारताची स्थिती जगाच्या तुलनेत चांगली आहे. जगभरातील वैज्ञानिकांकडून त्यावर प्रभावी लस शोधण्याचे काम सुरू आहे. ते पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत निर्देशांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. स्वच्छतेचे नियम भारतीयांनी गेल्या ४० दिवसांमध्ये चांगलेच आत्मसात केले आहेत. 

अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत 
लॉकडाउन २ संपल्यानंतर चार मेपासून अर्ध्या देशातील व्यवहार सर्वसामान्य होतील, असे जावडेकर म्हणाले. ‘‘संपूर्ण मानवजातीवरच हे संकट आलेले असताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणारच. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत मजबूत असून १३० कोटी इतकी प्रचंड जनसंख्या हीच जगातील सर्वात  मोठी बाजारपेठ आहे. लॉकडाउन संपूर्ण संपल्यावर देशातील उद्योगासह सारे व्यवहार पुन्हा एकदा पूर्वपदावर येतील. निर्यातीमध्ये आपला वाटा एक टक्के इतकाच होता तो कमी होण्याची शक्यता नाही. किंबहुना कोरोनापश्चात बदललेल्या जागतिक परिस्थितीत भारत हा जागतिक पटलावरील आशास्थान म्हणून समर्थपणे पुढे येईल. आगामी काळात येणाऱ्या संधींचे सोने करण्याची फार मोठी संधी भारताला मिळाली आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्व गुंतवणूकदारांचे भारतात कायमच स्वागत आहे,’’ असे ते म्हणाले. 

दिशाहीन विरोधक 
कोरोनावरील केंद्राच्या उपाययोजनांवर रोज उठून टीका करणारे विरोधक सिद्धांतविहिन आणि तत्त्वहीन आहेत असा आरोप जावडेकर यांनी केला. विरोधकांनी आजवर एकही रचनात्मक किंवा चांगला उपाय सरकारला सुचवलेला नाही. सरकारच्या उपाययोजनांची वाट पाहायची आणि मग टीका सुरू करायची हा विरोधी पक्षनेत्यांचा कोरोना काळातला एक कलमी कार्यक्रम झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. 

भारत विरुद्ध बंगाल 
मोदी सरकारच्या निर्णयाला सातत्याने विरोध करणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारवर टीकास्त्र सोडताना जावडेकर यांनी बंगालमधील काही लोक भारत विरुद्ध बंगाल असे युद्ध करू इच्छितात असा गंभीर आरोप केला. मात्र केंद्र प्रत्येक राज्याला या संकटात मदत करण्यास तत्पर आहे. आम्हाला या संकटातून देशाला बाहेर पाडण्यात रुची आहे, युद्धात आणि वाद-विवादामध्ये नव्हे असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com