
ओडिशात म्युकरमायकोसिसचा शिरकाव
भुवनेश्वर - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेतून (Second Wave) बरे झालेल्या काही रुग्णांना (Patient) आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचा (Sickness) सामना करावा लागत आहे. ओडिशात (Odisha) कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीत म्यूकरमायकोसिसची लक्षणे (Symptoms) आढळून आली असून त्यास ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दुजोरा दिला आहे. भुवनेश्वरच्या एका खासगी रुग्णालयात त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. (Infiltration of mucormycosis in Odisha)
आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले की, कोरोनातून बरे झालेल्या ७१ वर्षीय व्यक्तीला म्यूकरमायकोसिसची लक्षणे आढळून आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. राज्यात अन्यत्र कोठेही अशी लक्षणे आढळून आलेली नाही. मधुमेह असलेली पीडित व्यक्तीला गेल्या २० एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु डोळ्यावर सूज आणि नाकावर काळसरपणा दिसू लागल्याने शनिवारी त्यांना एसयूएम अल्टिमेट मेडिकेअर रुग्णालयात दाखल केले. कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. राधामाधव साहू यांनी राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजारावर उपचार उपलब्ध असल्याचे सांगत राज्यातील ही पहिलीच केस असल्याचे नमूद केले. संबंधित रुग्णास म्युकरमायकोसिस होण्यामागच्या कारणाचा शोध घेतला असता ते जुन्या एअरकुलरचा वापर करत होते आणि त्याचे पाणी बऱ्याच दिवसापासून बदलले नव्हते. त्यानंतरच या रुग्णास म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आली, असे डॉ. साहूंनी म्हटले आहे.
हेही वाचा: उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; देवप्रयागमधील घरे, दुकाने गेली वाहून
९५ वर्षीय महिलेची कोरोनावर मात
दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना एका ९५ वर्षीय महिलेने कोविडचा मुकाबला करत त्यावर मात केली आहे. केंओझार जिल्ह्यातील सुशीला बाला पाही असे त्या महिलेचे असून त्यांनी १९९७-२००२ या काळात जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा म्हणून काम केले होते. त्या मूळच्या ठाकूरपाटना गावच्या रहिवासी आहेत. २५ एप्रिल रोजी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर काल त्यांच्यावरील उपचाराला १५ दिवस पूर्ण झाले. कोरोनाग्रस्तांनी धीर सोडू नये आणि सकारात्मक विचाराने त्यावर मात करावी, असे सुशीला पाही म्हणतात.
लशीसाठी जागतिक निविदा काढणार
ओडिशा सरकारने ओएसएमसीएल मार्फत लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचा निर्णय घेतला. त्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी दोन समित्या नियुक्त केल्या आहेत. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सुमारे १,९३,६९,५११ नागरिक असून त्यांच्यासाठी ३,८७,३९,०२२ लशींची गरज आहे. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण आज कटक, रुरकेला, संभलपूर आणि बेहरामपूर महापालिकेच्या हद्दीत सुरू झाले.
Web Title: Infiltration Of Mucormycosis In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..