Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीत असे होते काही रंजक प्रश्न!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही मूलभूत आणि रंजक प्रश्‍न उपस्थित केले. त्यातील निवडक प्रश्‍नांविषयी...
 

नवी दिल्ली : अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, याठिकाणची वादग्रस्त जमीन तीन पक्षकारांना समान हिश्श्यांमध्ये विभागून देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत या जागेचे त्रिभाजन करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. येथील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 1950 पासून न्यायालयात असलेल्या या प्रकरणाच्या निकालाबाबात देशभरात उत्सुकता आहे. 

Ayodhya Verdict : मशिदीच्या जागेत आधी मंदिराचे अवशेष : सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही मूलभूत आणि रंजक प्रश्‍न उपस्थित केले. त्यातील निवडक प्रश्‍नांविषयी...
-------
- ८ ऑगस्ट २०१९ : येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी असा काही वाद आहे का?
- वादग्रस्त जागा ही श्रीरामांच्या जन्माचे ठिकाण आहे, तसा विश्‍वास आणि श्रद्धा आहे, असे हिंदूंकडून सांगितले जात होते. त्यावर न्यायालयाने आयोध्येसारखा जगात कुठे वाद आहे काय, अशी विचारणा केली. न्यायाधीशांनी वकील पराशरन यांना येशू ख्रिस्त यांच्या जन्मस्थळाविषयी असा काही वाद आहे का, अशी विचारणा केली होती.

- ९ ऑगस्ट : रघुवंश घराण्यातील कोणी आजही अयोध्येत वास्तव्यास आहेत?
- सुनावणीच्या पाचव्या दिवशी हा प्रश्‍न उपस्थित केला गेला, की श्रीराम यांच्यानंतर हजारो वर्षांनंतरही श्रीराम यांच्या रघुवंशाचे कोणी आजही अयोध्येत हयात आहे का? त्यानंतर जयपूर राजघराण्यातील भाजपच्या खासदार दियाकुमारी, राजस्थानातील मेवाड राजघराण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अरविंदसिंह मेवाड, करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्रनाथ कालवी आणि राजस्थानातील मंत्री प्रतापसिंह कचारिया हे तसा दावा करीत पुढे आले. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांतील दोन हजार लोक आम्ही रघुवंशातील आहोत, असा दावा करीत अयोध्येकडे निघाले. श्रीरामांचे वंशज हयात आहेत, असे सांगण्याचा त्यांचा हेतू होता.

Ayodhya Verdict : निकालानंतर सरसंघचालक भागवत करणार देशाला संबोधन

- १३ ऑगस्ट : श्रीरामांचा जन्म नेमक्‍या कोणत्या ठिकाणी झाला?
- बाबरी मशिदीच्या जागेवर केवळ मंदिरच नव्हते, तर तेथेच श्रीरामांचा जन्म झाल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांच्या वकिलांनी केला. ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी बाबरी मशिदीच्या मुख्य घुमटाखालचीच जागा श्रीरामांचे जन्मस्थळ आहे, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर मंदिर होते, हे मान्य केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. अलाहाबाद उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांपैकी न्या. शर्मा यांनी ती पूर्ण जागाच श्रीरामांचे जन्मठिकाण असल्याचे मान्य केल्याचा मुद्दा वैद्यनाथन यांनी मांडला.

- १४ ऑगस्ट : बाबरी मशिदीचा ‘बाबरनामा’मध्ये उल्लेख आहे काय?
- बाबर याने अयोध्येतील नदी पार केल्याचा उल्लेख आहे. पण, ‘बाबरनामा’ची काही पाने मिळत नाहीत, असे न्यायालयाने विचारलेल्या प्रश्‍नावर सुन्नी वक्‍फ बोर्डातर्फे बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी सांगितले. ‘या मशिदीला बाबरी मशीद कधीपासून म्हणू लागले? त्याबाबत ‘बाबरनामा’मध्ये काहीच आढळत नाही काय?’ असेही प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केले.

Ayodhya Verdict : पुण्यात आज दुपारच्या शाळा बंद; सकाळी भरलेल्या शाळा १० वाजता सोडल्या

- २८ ऑगस्ट : बाबराने अयोध्येला भेट दिली होती का?
- बाबराने अयोध्येला बहुतेक भेट दिली नव्हती, असा दावा रामजन्मभूमी पुनरुद्धार समितीचे वकील पी. एन. मिश्रा यांनी केला. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी, अकबराच्या दरबारातील अबुल फजल याच्या ‘ऐन-ए-अकबरी’ तसेच ‘हुमायूँनामा’ आणि बादशाह जहांगीरच्या आठवणीवरील ‘तुझूक-ए-जहांगीर’ या ग्रंथांमध्ये वादग्रस्त जागेवर बाबराने मशीद बांधल्याचा उल्लेख नाही, असे सांगितले. बादशाह औरंगजेबाच्या पदरी राहिलेला इटालियन निकोला मनुचीनेही अशा इमारतीचा उल्लेख केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

- ३ सप्टेंबर : मक्केतील काबा येथील वास्तू बांधली गेली की स्वयंभू आहे?
- श्रीरामांची जन्मभूमी ही न्यायिक व्यक्ती आहे, या मुद्द्यावरील चर्चेवेळी हा प्रश्‍न उपस्थित केला गेला. न्या. बोबडे यांनी राजीव धवन यांना, ‘‘काबा येथील वास्तूची निर्मिती केली गेली की ती स्वयंभू आहे?’’ असा प्रश्‍न केला. त्यावर धवन यांनी, ‘‘ती पवित्र वास्तू आहे. प्रेषित महंमद पैगंबर यांनी जगात एकच देव आहे, असे नमूद केले आहे,’’ असे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interesting questions while hearing of Ayodhya verdict