Chandrayaan 2 : इस्रोने ट्विट केला चंद्राच्या प्रकाशित भागाचा फोटो!

वृत्तसंस्था
Friday, 18 October 2019

चंद्राच्या पृष्ठभागावरून अरुंद आणि वक्रीय पद्धतीच्या लहरींमधून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे मापन करण्याची सोय 'आयआयआरएस'मध्ये आहे, असे ट्‌विट 'इस्रो'ने केले आहे.

बंगळूर : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान-2 ला काही अंशी अपयश आले असले तरी ही मोहिम सध्या कार्यरत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पाठवलेले यान चंद्रावर उतरू शकले नाही. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. मात्र, चंद्राभोवती फिरत असलेल्या यानाने आपले काम अजूनही सुरू ठेवले आहे.  

- सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार मराठी माणसाला?

'चांद्रयान 2'च्या 'इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्‍टोमीटर' (आयआयआरएस) या उपकरणाने प्रथमच चंद्राच्या प्रकाशित भागाचे छायाचित्र काढले असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ते गुरुवारी (ता. 17) प्रसिद्ध केले. 

चंद्राच्या पृष्ठभागावरून अरुंद आणि वक्रीय पद्धतीच्या लहरींमधून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे मापन करण्याची सोय 'आयआयआरएस'मध्ये आहे, असे ट्‌विट 'इस्रो'ने केले आहे. पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या उत्तर गोलार्धाचा भाग या छायाचित्रात दिसत आहे. त्याचबरोबर 'सॉमरफील्ड', 'स्टेबिन्स', आणि 'किरकू' ही विवरे दिसत आहेत. भूशास्त्रीय संदर्भात चंद्राचे मूळ आणि उत्क्रांतीचा मागोवा घेण्याचे मुख्य कार्य 'आयआयआरएस'मार्फत होणार आहे.

- आधी गादीला पाडलेल्या वळकट्या सरळ करा ; श्रीनिवास पाटलांचा उदयनराजेंना टाेला

यासाठी प्रकाशमान सौर लहरींमधून दिसणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजे आणि अस्थिर रचना यांचे नकाशामापन केले जाते. परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे विभाजन करून 800 ते पाच हजार नॅनोमीटर दरम्यानच्या विविध लहरींमध्ये ते विखुरण्याचे काम 'आयआयआरएस' करू शकते.

- Vidha Sabha 2019 : शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरेंविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर

यापूर्वी 'चांद्रयान 2' च्या 'ऑर्बिटर हाय रेझोल्युशन' कॅमेऱ्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाची टिपलेली छायाचित्रे 'इस्रो'ने 4 ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO tweeted first illuminated image of the lunar surface captured by Chandrayaan 2