उमर खलिदची न्यायालयासमोर तक्रार; मला कोठडीतून बाहेरही पडू दिलं जात नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता उमर खलिद याला फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अटक केली गेली आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता उमर खलिद याला फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अटक केली गेली आहे. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) कायद्याअंतर्गत उमर खलिद सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. काल गुरुवारी त्याने न्यायालयात सांगितलं की त्याला त्याच्या कोठडीमधून बाहेर पडू दिलं जात नाही. तसेच त्याला एकांतवासात ठेवण्यात आलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी यानंतर तिहार जेलच्या अधिक्षकांना आज शुक्रवारी या प्रकरणी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याची सुचना दिली आहे.  

न्यायालयीन कोठडी पुर्ण झाल्यानंतर त्याला जेंव्हा व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगद्वारे न्यायालयासमोर दाखल केलं गेलं तेंव्हा त्याने आपलं म्हणणं मांडलं. कॉन्फ्रंस चालू असताना न्यायालयाशी खलिद याला  बोलायची इच्छा असताना माईक सुरु न केल्याबद्दल न्यायालयाने अधिक्षकांना फटकारले. 

हेही वाचा - Bihar Election : प्रचाराची रणधुमाळी शिगेला; PM मोदींच्या तीन तर राहुल गांधीच्या दोन सभा

न्यायाधीशांनी जेल अधिकाऱ्यांना म्हटलं की, जर त्यांना काही बोलायचे असेल तर त्यांना बोलू द्या. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर खलिदने म्हटलं की, मला कोठडीतून बाहेर पडण्यासाठी बिलकुल परवानगी दिली जात नाही. मी माझ्या कोठडीत एकटाच आहे. कुणालाही भेटण्याची मला परवानगी नाहीये. व्यावहारीकदृष्ट्या मला पूर्णपणे एकांतात कैद केलं गेलं आहे. 
माझी तब्येत गेल्या तीन दिवसांपासून बरी नाहीये. मला व्यवस्थित वाटत नाहीये. हे शिक्षेसारखं आहे. मला ही शिक्षा का दिली जातीय? मी परत सांगतो की मला सुरक्षेची गरज आहे मात्र संपुर्ण दिवस मला कोठडीमध्ये ठेवून हे होणार नाहीये. त्याने म्हटलं की बुधवारी मला अतिरिक्त अधिक्षक प्रदीप शर्मा यांनी जारी केलेला आदेश दाखवला ज्यात म्हटलंय की खलिदला आपल्या कोठडीतून बाहेर पडण्याची  परवानगी दिली जाऊ नये. खलिदने म्हटलंय की, मी या आदेशाला मागे घेण्याचे आवाहन करतो. जेल अधिक्षकांनी मला बाहेर पडण्याची परवानगी द्यावी. मी जवळपास फक्त 10 मिनिटे बाहेर घालवली आणि त्यानंतर ते परत गेले. त्यानंतर मला परत कधी बाहेर पडण्याची परवानगी दिली गेली नाहीये. 

हेही वाचा - Bihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली

खलिदचे वकील त्रिदीप पाइस यांनी न्यायालयाना म्हटलं की जेलमध्ये त्यांना एकांतवासात ठेवलेल्या तक्रारीबद्दल त्यांच्याविरोधात कसलीही कारवाई व्हायला नको. यावर न्यायालयानेही म्हटलं की, आपली तक्रार मांडण्याची कसलीही शिक्षा खलिद यांना दिली जाणार नाही. आपण याबाबत लक्ष ठेवा. याआधी न्यायालयाने 17 ऑक्टोबर रोजी तिहार जेलच्या अधिक्षकांना सुचना दिल्या होत्या की त्यांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या उमर खलिदला आवश्यक ती सुरक्षा द्या. 

24  फेब्रुवारी रोजी उत्तर-पुर्व दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये हिंसा भडकली  होती. या दंगलीत जवळपास 53 लोकांचा मृत्यू आणि 200 लोक जखमी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jnu student leader umar khalid says in court i havent permitted to go outside