esakal | काँग्रेसची 'चौकट' मोडली, नेत्यांच्या भाजप प्रवेशानं राहुल गांधींसमोर संकट
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसमधील युवा चेहरे एकेक करुन पक्षाची साथ सोडताना दिसताहेत. ज्योतिरादित्य शिंदेनंतर युवा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपची वाट धरलीये. हा केवळ राहुल गांधी यांनाच नाही, तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेससाठी मोठा झटकाय.

काँग्रेसची 'चौकट' मोडली; राहुल गांधींसमोर काय आहे संकट?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

काँग्रेसमधील युवा चेहरे एकेक करुन पक्षाची साथ सोडताना दिसताहेत. ज्योतिरादित्य शिंदेनंतर युवा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपची वाट धरलीये. हा केवळ राहुल गांधी यांनाच नाही, तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेससाठी मोठा झटकाय. काँग्रेसमध्ये राहुल गांधींची 'चौकडी' म्हणून ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, जितिन प्रसाद आणि मिलिंद देवरा यांना ओळखलं जातं होतं. आता एकेक नेते पक्षापासून वेगळे होताहेत. असे असले तरी, एक वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाऊनही प्रतिष्ठित स्थान मिळवता न आल्याने ज्योदिरादित्य शिंदें यांच्यात अस्वस्थता आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधील युवा नेते सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळेच हे चार युवा नेते सध्या चर्चेत आलेत.

जितिन प्रसाद यांची भाजपमध्ये भूमिका काय असेल?

काँग्रेसचे दिग्गज नेता जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद मागील लोकसभा निवडणुकीमध्येच भाजपमध्ये जाण्यास तयार होते. पण, प्रियांका गांधींच्या येण्याने परिस्थिती बदलेले या आशेने ते पक्षात राहिले. पण, अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या येण्याने भाजपला किती फायदा होईल हे पाहावं लागेल, पण 2021 च्या यूपीतील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसलाय. जितिन यांचे आजोबा आणि वडील अशा तीन पिढ्या काँग्रेसशी संबंधीत होत्या आणि त्यांचा परिवार गांधी परिवाराच्या जवळचा राहिलाय. राहुल गांधींच्या टीमचे जितिन महत्त्वाचे सदस्य होते. त्यामुळेच पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री बनवण्यात आलं होतं. राहुल गांधींची साथ त्यांनी तेव्हा सोडलीये, जेव्हा त्यांना त्यांची सर्वाधिक गरज होती.

हेही वाचा: मुलांसाठी गाईडलाईन्स जाहीर; रेमडेसिव्हिर न वापरण्याचा सल्ला

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपमध्ये काय मिळालं?

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. याला आता एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय. पण अजूनही ते फक्त राज्यसभा खासदारच आहेत. राज्यसभेत त्यांना काँग्रेसमध्ये राहुन सुद्धा जाता आलं असतं. त्याचमुळे शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. शिंदे काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेते बनले होते, पण भाजपमध्ये त्यांना असं स्थान मिळू शकलेलं नाही. शिंदे यांना केंद्रात मंत्रीपदाची इच्छा आहे, पण भाजपकडून याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे भाजपमध्ये ते आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करताना दिसताहेत.

सचिन पायलट यांच्या बंडखोरीचं टेंशन!

राजस्थानमध्ये बंडखोरी केलेले युवा नेते सचिन पायलट यांना दिली गेलेली आश्वासनं 10 महिन्यांनतरही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा बंडखोरीची ठिंणगी पडण्याची शक्यताय. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वात अनेक काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडखोरीचं शस्त्र उपसलं होतं. पायलट-गेहलोत यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपवण्यासाठी एक कमिटी बनवण्यात आली, पण आतापर्यंत पायलट यांच्या ज्या सहकाऱ्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं, त्यांना ते परत करण्यात आलेलं नाही. तसेच कमिटीसमोर ठेवण्यात आलेल्या मागण्यांवर काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पायलट आणि त्यांच्या सहकार्यांची सहनशक्ती संपत असून बंडखोरीचा सूर उमटत आहे.

हेही वाचा: प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

मिलिंद देवरांचा बदलता मूड

राहुल गांधींच्या चौकडीमध्ये येणारे 44 वर्षीय मिलिंद देवरा यांच्यामध्येही अस्वस्थता आहे. त्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्यातून हे स्पष्ट जाणवतंय. भारत-चीन प्रकरणी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणे, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकारवर स्थापन करण्यावर नाराजी, पंतप्रधान मोदींचे कौतुक आणि काँग्रेसमधील अंतर्गत बदलांसाठी इतर नेत्यांसोबत सोनिया गांधींना पत्र लिहिने यातून त्यांची नाराजी दिसतेय. काँग्रेस नव्या अध्यक्षाची निवड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच ज्योतिरादित्य शिंदेनंतर जितिन प्रसाद यांचे भाजपमध्ये जाणे, तसेच सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांची नाराजी काँग्रेसची डोकदुखी वाढवू शकते. या आव्हानांचा गांधी परिवार विशेष करुन राहुल गांधी कशा पद्धतीने सामना करतात, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.