कंगना भाजपात प्रवेश करणार? सोनिया गांधींवरील टीकेनंतर रंगतीये चर्चा

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 September 2020

कंगनाचे दिवंगत आजोबा सरजू राम हे मंडी जिल्ह्यातील गोपालपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. 

शिमला : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या चांगलीच चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर तिने थेट  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. कंगनाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थितीत केल्यानंतर कुटुंबियांसह ती भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा हिमाचल प्रदेशमध्ये रंगण्यास सुरुवात झाली आहे.  कंगना राणावतची आई आशा राणावत या भाजपमध्ये येण्यास इच्छूक असतील तर स्वागत करण्यास पक्ष कार्यकर्ते उत्सुक आहेत, असे हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी म्हटले आहे.  

'कंगना रनौत बनणार महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री?' वाचा असं कोण म्हणालंय

आशा राणावत यांनी संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून काम केले आहे. कंगना राणावतच्या वादग्रस्त ठरलेल्या भूमिकेनंतर मदतीचा हात दिल्याचा उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले होते.  आम्ही काँग्रेसचे समर्थक असल्याचे माहित असूनही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. कंगनाचे दिवंगत आजोबा सरजू राम हे मंडी जिल्ह्यातील गोपालपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. 

कंगनाचा रोख सोनिया गांधींकडे 

कंगना शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये सोनिया गांधींना उद्देशून  म्हटलं होतं की, महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. तुम्हीदेखील एक स्त्री आहात. जी वागणूक मला सध्या महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे, ती पाहून एक स्त्री म्हणून तुमच्या मनाला यातना होत नाहीत का? आणि आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील तत्वांचे पालन करण्याच्या सूचना आपल्या सरकारला देऊ शकत नाही का?  असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न काहींना पडला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ती भाजमध्ये प्रवेश करु शकते, अशी चर्चाही रंगताना दिसतेय. 
 

खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही'; कंगनाला शिवसेना नेत्याने मारला टोला

कंगनाच्या समर्थनार्थ भाजपाची रॅली

गुरुवारी हिमाचल प्रदेश भाजपाने मनालीपासून 155 किमी दूर असलेल्या भांबला या कंगनाच्या गावापर्यंत एकजूटीचा संदेश देत रॅली काढली होती. असं म्हटलं जात आहे की, यापूर्वीच हिमाचल प्रदेशातील भाजपाने राणावत कुंटुंबाला पक्षात सामिल होण्यासाठी दार उघडे ठेवले आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली होती. कंगना राणावतची आई आशा राणावत यांचा राजकारणात येण्याचा विचार असल्यास भाजपाकडून त्यांना ऑफर असल्याचं हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप म्हणाले आहेत.

कंगनाच्या आईचे ट्विटरवर वाढले फॉलोवर्स

कंगनाची आई आशा या ट्विटरवर नुकत्याचच सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या अकाऊंटवरून जास्त ट्विट हे गेल्या महिन्यापासून होत असून त्यांनी  काँग्रेस आणि शिवसेनाविरोधात लिहलं आहे. आधी आशा राणावत यांचे ट्विटर फॉलोवर्स हे 1800 होते. आता गेल्या काही दिवसात त्यात वाढ होऊन त्यात 10000 पेक्षा अधिक फॉलोवर्सची भर पडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut targets sonia gandhi may be signal she join bjp