Kargil Vijay Diwas : कारगीलची शौर्यगाथा : लाखाची नोकरी सोडून विक्रम बत्रा झाले होते लष्करात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकला भारतानं चारीमुंड्या चित केलं होतं. कारगिल युद्ध जवळपास अडीच महिने चाललं होतं. या ऑपरेशन विजयमध्ये भारताचे 527 हून जास्त वीर हुतात्मा झाले. तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते.

नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी 26 जुलै 1999 ला कारगील युद्धात पाकला धूळ चारली होती. हाच दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकला भारतानं चारीमुंड्या चित केलं होतं. कारगिल युद्ध जवळपास अडीच महिने चाललं होतं. या ऑपरेशन विजयमध्ये भारताचे 527 हून जास्त वीर हुतात्मा झाले. तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते. कारगिल युद्धात शौर्य दाखवणाऱ्या अनेक योद्ध्यांच्या कथा आजही अभिमानाने सांगितल्या जातात. अशाच एका सहकारी योद्ध्याची आठवण पठाणकोट इथल्या घरोटा गावातील वीरचक्र विजेता कॅप्टन रघुनाथ सिंग यांनी सांगितली आहे. कारगिल युद्धाच्या आठवणी सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुलून येते. 

कारगिल युद्धाचा अनुभव सांगताना कॅप्टन रघुनाथ सिंग यांनी म्हटलं की, कारगिलमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा आघाडीवर लढले. भारतीय सैन्यात येण्याआधी त्यांना एक लाख रुपये पगाराची नोकरी होती. मात्र देशाची सेवा करण्यासाठी, थेट सीमेवर लढायचं म्हणून ती नोकरी सोडली आणि लष्करात दाखल झाले. कॅप्टन बत्रा यांनी कारगील युद्धात पाकच्या दहा सैनिकांना मारून पॉइंट 5140 वर तिरंगा फडकवला होता. 

हे वाचा - लष्कराच्या कारवाईला मोठं यश! श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

कॅप्टन बत्रा यांना वीरमरण आलं आणि त्यानंतर रघुनाथ यांनी कॅप्टन पदाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर सहकाऱ्यांसह चोख प्रत्युत्तर दिलं. पाक सैन्याचे ग्रुप कमांडर इम्तियाज खान यांच्यासह त्यांच्या 12 सैनिकांना यमसदनी धाडलं. तेव्हा बर्फाळ भागात असलेल्या पाँइटवर तिरंगा फडकावून कॅप्टन बत्रा यांच्या बलिदानाचा असा बदला घेतला. 

रघुनाथ सिंग यांनी सांगितलं की, 7 जुलै 1999 ला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर मास्को घाटीतील पॉइंट 4875 दुश्मनच्या ताब्यातून सोडवण्याची मोहीम सोपवण्यात आली होती. बत्रा यांनी शौर्याने लढताना कॅप्टन बत्रा यांनी त्यांची मोहीम फत्ते केली होती. बत्रा यांनी जिथं तिरंगा फडकवला त्या ठिकाणाला बत्रा टॉप म्हणून ओळखलं जातं. 

हे वाचा - भारताची शस्त्रसज्जता! अमेरिकेकडून अत्याधुनिक विमान खरेदीची प्रक्रिया सुरु

मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद तर सर्वांनाच झाला होता. दरम्यान, कॅप्टन विक्रम यांना त्यांचा ज्यूनिअर सहकारी लेफ्टनंट नवीन जखमी झाल्याचं दिसलं. ग्रेनेड हल्ल्यात पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला कॅप्टन बत्रा यांनी खांद्यावर घेऊन सुरक्षित जागी निघाले होते. तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यात एक गोळी त्यांच्या छातीतून आरपार गेली होती. बत्रा यांनी यावेळी ‘दिल मांगे मोअर’ अशी घोषणाबाजी केली होती. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kargil vijay diwas captain batra who martyred in war