पुण्याची कशीष मेथवानी सर्वोत्तम कॅडेट; राज्याच्या ‘एनसीसी’ला राष्ट्रीय उपविजेतेपद 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 January 2021

पुण्याची कशीष मेथवानी ‘एनसीसी’च्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली - महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) प्रजासत्ताकदिनाच्या संचलनातील प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद पटकाविले आहे. पुण्याची कशीष मेथवानी ‘एनसीसी’च्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले. यंदाच्या प्रजासत्ताकदिन संचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी कॅडेटसने उपविजेतेपद तर आंध्र प्रदेश व तेलंगण संचालनालयाने विजेतेपद पटकावले आहे. 

आजच्या कार्यक्रमात नाशिक येथील भोसला सैनिकी महाविद्यालयाचा उपकार ठाकरे याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला. महाराष्ट्राने यापुर्वी १७ वेळा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान बॅनरचा बहुमान पटकाविला आहे. हवाई दलाच्या बेस्ट कॅडेट्‌सचा बहुमान पटकाविणारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायो इन्फॉर्मेटीक अँड बायो टेक्‍नॉलॉजीची विद्यार्थीनी वॉरंट ऑफिसर कशीष मेथवानीचा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी हवाई दलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील एकूण १०० कॅडेट्‌समध्ये चुरस होती. लेखी परिक्षा, समूह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबीरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्‌ची निवड करण्यात आली. 

कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप

हवाई दलाच्या बेस्ट कॅडेट्‌समध्ये पुण्यातील श्रीशिवाजी सोसयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक सिंग याने दुसरे स्थान तर नौदलाच्या बेस्ट कॅट्‌समध्ये पुण्याच्याच मॉर्डन महाविद्यालयाच्या तनाया नलावडेने दुसरे स्थान पटकाविले. देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २८ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबीरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि एनसीसीचे महासंचालक यावेळी उपस्थित होते. 

तोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात

महाष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कॅंन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील १६ मुले व १० मुली असे एकूण २६ कॅडेट्‌स सहभागी झाले होते . पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या कॅडेट्‌सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्‌स १ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील शिबीरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्याही मुलींची निवड झाली. विशेष म्हणजे यंदा मुलींच्या राष्ट्रीय तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्राच्या संघातील जळगावच्या मुलजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थीनी सिनीयर व अंडर ऑफिसर समृद्धी संत हिने केले. यंदा महाराष्ट्रातील १६ पैकी तब्बल ११ मुलांची निवड राजपथवरील राष्ट्रीय पथ संचलनासाठी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashish Methwani Best Cadet state NCC won